पुणे : सिम्बायोसिस विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करण्यासाठी लवळे गावातील कच्च्या रस्त्यावरून जावे लागते. या रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सिम्बायोसिस विद्यापीठाने प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याला ‘ज्ञान मार्ग’ असे नाव दिले आहे. याचा संदर्भ देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘ज्ञान मार्गाची सुरुवात होण्यापूर्वी या अज्ञान मार्गावर आलो. मागच्या वेळी हेलिकॉप्टरने आलो. या वेळी मला ज्ञानाबरोबर अज्ञानाचाही अनुभव मिळाला.’
लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. सिम्बायोसिसच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर, कुलसचिव डॉ. एम. एस. शेजूळ उपस्थित होते. गडकरी यांनी ‘पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध’ या विषयावर भाष्य केले.
‘भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांची क्षमता ठरवली पाहिजे. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, जलमार्ग आणि दळणवळणाच्या सुविधा विकसित करताना आजच्या गरजांबरोबरच पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगार वाढतो. वाहतूक खर्च कमी झाल्यास भारतीय उद्योगांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करणे सोपे होणार आहे. चांगले रस्ते असल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमाल पोहोचवणे सोपे होते. ग्रामीण भाग शहरांशी जोडला जातो आणि तेथेही उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण होतात,’ असे गडकरी यांनी सांगितले.
‘तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची गुणवत्ता तपासणे, ड्रोन, एआय, लिडार आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने दोष आधीच ओळखणे आणि ‘रिपेअर आफ्टर फेल्युअर’ऐवजी ‘प्रेडिक्ट बिफोर फेल्युअर’ या पद्धतीने देखभाल करणे आवश्यक आहे. ‘नॉलेज विथ एथिक्स’ आवश्यक असून ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, गुणवत्ता आणि मूल्ये जपली पाहिजेत. शॉर्टकटने दीर्घकाळ यश मिळत नाही,’ असा संदेशही गडकरींनी तरुणांना दिला. विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण यांनी आभार मानले.
