पुणे : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई वाढत आहे. मागील काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅससह इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर भाष्य करत आवश्यकता असेल तेथेच वाहनांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देशाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पेट्रोल बाबत देखील महत्वाची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, ‘ग्रामीण अर्थव्यवस्था देशाला सामर्थ्यशाली बनविण्याचा पाया आहे. त्यामुळे स्मार्ट शहरांबरोबरच स्मार्ट व्हिलेजची उभारणी करणे गरजेचे आहे.
इंधनाची वाढती मागणी भागविण्यासाठी पेट्रोलमध्ये अधिकाधिक इथेनॉल मिक्स करण्याचा विचार असून यासाठी पेट्रोल कंपन्यांसह वाहन कंपन्यांशी चर्चा सुरू असून लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल,’ असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’च्या वतीने (विस्मा) ‘साखर आणि जैवऊर्जा’ परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गडकरी आले होते. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महासचिव पांडुरंग राऊत, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘देशाला आर्थिकदृष्ट्या अधिक सामर्थ्यशाली बनवायचे असेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात फारशी प्रगती न झाल्याने तेथील नागरिक शहरात येत आहेत. त्यामुळे शहरातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास अधिक झाला पाहिजे.
गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या वाढल्याने इंधनाची मागणीही वाढत चालली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इथेनॉलचे पेट्रोलमध्ये प्रमाण अधिक प्रमाण कसे वाढेल, यासाठी संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.’
बागडे म्हणाले, उसाचे एकरी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. कारखाने वाढल्याने गाळप हंगाम लवकर संपतो. त्यामुळे साखरेचा उतारा कमी झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कारखाने सुरु केल्यास उतारा चांगला मिळेल. खासगी आणि सहकारी कारखान्याला इथेनॉलचा कोटा एकसमान मिळाला पाहिजे. बाबासाहेब पाटील म्हणाले, नवीन उद्योजकांनी अभ्यास करून या क्षेत्रात आले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.
अनेक कारखान्यानी गरज नसताना क्षमता वाढ केली, त्याचा फटका बसला. देशाची व्यवस्था कृषी क्षेत्रावर आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. विविध विभागांसाठी साखर कारखाने आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कारांनी गौरविण्यात आले. बी. बी. ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. तर खजिनदार महेश देशमुख यांनी आभार मानले.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले…
- कोणते पीक घ्यायचे हे शेतकऱ्यांना विचार करून ठरवावे लागेल.
- आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे हा सर्वात मोठा राष्ट्रवाद आहे.
- साखरेवर अवलंबून न राहता उपपदार्थ तयार करण्यावर भर दिला पाहिजे.
- जमीन वाचविण्यासाठी सेंद्रीय खत निर्मिती करावी.
