लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष न दिल्याने पुण्यासारख्या शहराची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे देशात ‘स्मार्ट सिटी’ नाही, तर ‘स्मार्ट व्हिलेज’ झाले पाहिजेत,’ अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. गाव, गरीब, कामगार, शेतकरी संपन्न होत नाही, तोपर्यंत देश आत्मनिर्भर होण्यात अडचण आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यापीठाच्या सीओईपी अभिमान पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गडकरी बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, प्रा. सुजीत परदेशी या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती पी. एन. भगवती यांना सीओईपी जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील जे.पी. मॉर्गन चेसच्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक हृषीकेश सागर यांना सीओईपी अभिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आणखी वाचा-मुंबई-बेंगळुरू प्रवास आता अधिक वेगवान, होणार १४ पदरी महामार्ग
गडकरी म्हणाले, की ज्ञानाचे संपत्तीमध्ये रुपांतर हेच भविष्य आहे. संशोधन, नावीन्य या आधारे देशाचा विकास मोजला जातो. काही वर्षांपूर्वी देशातील वाहनोद्योग सात लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेला आणि जगात सातवा स्थानी होता. आता वाहनोद्योगात जपानला मागे टाकून भारत तिसऱ्या स्थानी आहे. सध्या २२ लाख कोटी रुपयांची होणारी उलाढाल ५५ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात संशोधनाची भूमिका मोलाची ठरणार आहे. पुढील पाच वर्षांत शहरी वाहतुकीमध्ये सर्व विद्युत वाहनेच असतील. भारत अमेरिकेला मागे टाकेल. सर्व मोठे वाहन उद्योग भारतात आहेत. नवउद्यमींनी बॅटरीच्या क्षेत्रात खूप चांगले काम केले आहे. पुढील दोन वर्षांत भारत सेमी कंडक्टर उत्पादनाचे केंद्र आहे. संशोधन, नवसंकल्पनेच्या क्षेत्रात देशातील अभियंत्यांचे काम उत्तम आहे.
देशात २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करावे लागते. त्यातून एकूण प्रदूषणापैकी ४० टक्के प्रदूषण होते. संशोधन स्थानिक गरजा भागवणारे, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर, शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले असले पाहिजे. तंत्रज्ञान समाजाचा विकास आणि गरिबांचे जीवन उंचावणारे असले पाहिजे. इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. सॉफ्टवेअरमध्ये देशातील अभियंत्यांनी अव्वल असल्याचे दाखवून दिले. आता अन्य क्षेत्रातही प्रचंड संधी आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.
जवळपास ६८ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्याची पायाभरणी सीओईपीमध्ये झाली. त्या जोरावरच माझी कारकिर्द घडवू शकलो. देशातील उद्योगजगतामध्ये योगदान देऊ शकलो. मला घडवणाऱ्या या संस्थेविषयी माझ्या मनात कृतज्ञता आहे. आता मला सीओईपीमध्ये फाऊंड्री क्षेत्रातील ‘एक्सलन्स सेंटर’ची स्थापना करण्याची इच्छा आहे, अशी भावना भगवती यांनी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे व्यक्त केली.
विद्युत वाहनांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’
याच कार्यक्रमात मोटार उद्योगातील फियाट ही कंपनी आणि सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत विद्यापीठात विद्युत वाहन तंत्रज्ञानासाठीचे सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.