पुणे : देशाच्या विकासात काहीतरी चांगले होते, तेव्हा विरोधकांना त्याचा त्रास होतो. देश विविध क्षेत्रात चांगली प्रगती करत असून विरोधी पक्षांकडे केवळ नकारात्मक वृत्ती आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी विरोधकांना सुनावले. देशात एआय समिट झाले तरी त्याचाही विरोधकांना त्रास होत असल्याची टीका त्यांनी केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बुधवारी पुणे दौऱ्यावर आले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नबीन यांनी मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’चे दर्शन घेत आरती केली. त्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांच्या महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या ‘श्रीं’चे दर्शन घेतले. तेथे उपस्थित माध्यमांशी संवाद साधताना नबीन यांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देत केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी राबवित असलेल्या योजनांचे कौतुक त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक सुनील पांडे, रवी साळेगावकर उपस्थित होते.
केंद्र सरकारने दोन हजार रुपयांपेक्षा अधिक युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याची अधिसूचना काढली आहे. यावरुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. अमेरिकेच्या दबावापुढे पंतप्रधान मोदी झुकल्याची टीका गांधी यांनी केली होती.
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नबीन यांना विचारले असता ते म्हणाले, देशाचा विकास होऊन सर्वसामान्यांचे हित जोपासले जाते. ही अडचण विरोधकांना आहे. विरोधकांना देशाचा विकास पहावत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे ‘सबका साथ, सबका विकास’ आणि सर्वांच्या विश्वासाला सोबत घेऊन विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. यामुळे विविध क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. मात्र विरोधकांना हा विकास पाहून त्रास होतो.
देशात आज कितीतरी प्रकारच्या विकास योजना सुरू आहेत. पायाभूत सोयीसुविधांचा (इन्फ्रास्ट्रक्चरचा) मोठा विकास होत आहे. सद्यस्थितीत ७ लाख कोटींपेक्षा अधिक निधी हा पायाभूत सुविधांवर खर्च होत आहे. आज संरक्षण क्षेत्रात (डिफेन्स सेक्टर) कशा प्रकारे वाढ होत आहे, अशा विकासाच्या गोष्टींवर विरोधक कधीही उत्तर देऊ शकत नाहीत. त्यांच्यामध्ये प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचार करण्याची वृत्ती असल्याने ते या विषयांवर बोलत असल्याचे नबीन यांनी सांगितले.
आयुष्मान भारतचे कवच लाखो-करोडो लोकांना मिळत आहे. कोट्यवधी नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. या सर्व गोष्टींवर विरोधक चर्चा करू इच्छित नाहीत, हीच त्यांची प्रवृत्ती असल्याची टीकाही त्यांनी केली.
गणेशोत्सव उर्जेचा केंद्रबिंदू
गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. मुंबईनंतर पुण्यातील कसबा गणपतीपासून अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्याची संधी मिळाल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सांगितले. गणेशोत्सव महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही सर्वांसाठी खूप उत्साह आणि ऊर्जेचा केंद्रबिंदू ठरली आहे. गणेशोत्सव हा उत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
