पुणे : भविष्यातील विषाणूजन्य आजारांच्या वाढत्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी–राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आता स्वदेशी वैद्यकीय उपायांच्या निर्मितीवर अधिक भर देणार आहे. संस्थेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या शोधनिबंधात याची माहिती दिली आहे.

शोधनिबंधात म्हटले आहे, ‘पुढील पाच वर्षांत अँटिव्हायरल औषधे, नव्या पिढीतील लस तंत्रज्ञान, मोनोक्लोनल अँटिबॉडीज आणि स्वस्त व जलद निदान चाचण्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून, जनुकीय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘वन हेल्थ’च्या माध्यमातून उद्रेकांचा लवकर शोध घेऊन तातडीने प्रतिसाद देण्याची यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे.

स्वदेशी उपचारनिर्मितीबाबत यात म्हटले आहे, ‘‘एनआयव्ही’चा स्वदेशी वैद्यकीय उपायांच्या विकासावर असलेला भर आत्ताचा नसून, त्याची भक्कम पायाभरणी यापूर्वीच्या विविध संशोधन प्रकल्पांतून झाली आहे. जपानी मेंदूज्वरावरील स्वदेशी जेईएनव्हीएसी लस, कोव्हिड-१९ प्रतिबंधक लस विकासातील योगदान, कोविड कवच यासाठीच्या रक्तचाचण्यांसह विविध स्वदेशी निदान चाचण्या, चिकुनगुनिया आणि इतर विषाणूजन्य आजारांवरील विषाणूविरोधी औषधांच्या संशोधनाचा त्यात समावेश आहे. सध्या निपाह विषाणूविरोधी प्रतिपिंडे, वन रोगावरील लस, इन्फ्लुएंझासाठी विविध लस तंत्रज्ञान आणि नवीन विषाणूविरोधी औषधांच्या संभाव्य उमेदवारांवरही संशोधन सुरू आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांची योजना ही या आधीच्या संशोधन व तंत्रज्ञान विकासाला अधिक व्यापक आणि एकात्मिक वैद्यकीय उपायांच्या दिशेने पुढे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल.

‘उदयोन्मुख संसर्गांचा लवकर शोध घेण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत रोग-मॉडेलिंगचा वापर वाढविण्याची ‘एनआयव्ही’ची योजना आहे. मानव, प्राणी आणि पर्यावरणातील संसर्गजन्य धोक्यांचा एकत्रित अभ्यास करणारी ‘वन हेल्थ’ आधारित रोगनिगराणी व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे. त्याचबरोबर जैविक नमुना-संग्रह आणि उच्च-सुरक्षा प्रयोगशाळांची क्षमता वाढवून वैज्ञानिक प्रशिक्षणाला चालना दिली जाणार आहे. या कामासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांसोबत धोरणात्मक भागीदारी करण्याचे नियोजन असून, देशातील विविध येणारी केंद्रांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावरही भर राहणार आहे,’ असेही या शोधनिबंधात अधोरेखित करण्यात आले आहे.

चाचण्यांचा वेग वाढला

‘मार्च २०२०च्या सुरुवातीला देशात दररोज सुमारे २५० चाचण्या होत असताना एप्रिलअखेर ही क्षमता ५० हजार चाचण्या प्रतिदिनांपर्यंत पोहोचली. याच काळात सार्स-२चे भारतातील नमुने वेगळे करून त्यांचे जनुकीय विश्लेषण करण्यात आले. त्यातून विषाणूच्या बदलत्या प्रकारांचा मागोवा घेणे शक्य झाले. स्वदेशी लस आणि अँटिबॉडी चाचण्यांच्या विकासालाही संस्थेने हातभार लावला,’ असे शोधनिबंधात म्हटले आहे.

शोधनिबंधात ‘एनआयव्ही’च्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, ‘१९५२ मध्ये ‘व्हायरस रिसर्च सेंटर’ म्हणून सुरू झालेल्या आणि १९७८ मध्ये  म्हणून विकसित झालेल्या या संस्थेने कोव्हिडच्या सुरुवातीच्या काळात देशाच्या रोगनिदान व्यवस्थेला आधार दिला. देशातील १६७ व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज आणि २३ ‘बीएसएल-३’ प्रयोगशाळांचे राष्ट्रीय संसाधन केंद्र म्हणून संस्थेने चाचण्यांचे मानकीकरण, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रयोगशाळा क्षमता वाढविण्यात योगदान दिले.’

‘निपाह’मध्ये ‘चार तासांचा’ प्रतिसाद

‘‘निपाह’च्या उद्रेकांनी वेगवान निदानाचे महत्त्व अधोरेखित केले. केरळ आणि पश्चिम बंगालमधील उद्रेकांत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींबरोबरच वटवाघळांमध्येही देखरेख करण्यात आली. २०२३पासून वापरात आलेल्या मोबाइल  प्रयोगशाळेमुळे कोझिकोडमधील उद्रेकात घटनास्थळी सुमारे चार तासांत निदान शक्य झाले. संशयापासून कृतीपर्यंतचा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने ही क्षमता महत्त्वाची ठरते.

‘ज्ञात’ विषाणूंपासून ‘अज्ञात’ धोक्यांपर्यंत नजर

झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया, चांदिपुरा आणि इतर विषाणूजन्य आजारांच्या देखरेखीत संस्थेने प्रयोगशाळीय निदानासोबत जनुकीय आणि महामारीशास्त्रीय विश्लेषणाचा वापर वाढविला. २०२४मधील पुण्यातील झिका उद्रेकातही या पद्धतीचा वापर झाला. मंकी फिवरचा प्रसार महाराष्ट्रातील सिंधुदुर्गपर्यंत झाल्याचे जनुकीय विश्लेषणातून स्पष्ट झाले. २०२४मध्ये गुजरातमधील चांदिपुरा उद्रेकाचेही संस्थेने निदान व वैशिष्ट्यीकरण केले.

उद्रेक संपल्यानंतरही तयारी सुरूच

‘एनआयव्ही’ने गेल्या दशकात विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा नेटवर्क मधील ६ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून डेंग्यू, चिकुनगुनिया आणि जपानी एन्सेफलायटिससाठी सुमारे १.२४ लाख रक्त चाचणी करणाया किट्स पुरविल्या आहेत. संस्थेच्या राष्ट्रीय विषाणू भांडारातून २०२५-२६ मध्येच १८ संस्थांना २७ प्रमाणित विषाणूंचे नमुने देण्यात आले.