पुणे : रुग्णांना आकर्षित करण्यासाठी वैद्यकीय उपचारांबाबत अवास्तव आश्वासने देणे, स्वतःला ‘सर्वोत्तम डॉक्टर’ म्हणून जाहिरात करणे, समाजमाध्यमांवर बनावट रिव्ह्यू आणि रेटिंगचा डॉक्टरांना महागात पडणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नीतिमत्ता आणि वैद्यकीय नोंदणी मंडळाने रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठी जाहिरात व सार्वजनिक संवादासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्या तत्काळ लागू केल्या आहेत.
वैद्यकीय व्यवसायाचे व्यावसायिकीकरण रोखणे, रुग्णांचे हित जपणे आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना आळा घालणे हा या नियमांचा उद्देश आहे. या नियमांनुसार, डॉक्टरांना ‘सर्वोत्तम’, ‘नंबर वन’, ‘शंभर टक्के यश’, ‘चमत्कारिक उपचार’ किंवा हमखास रोगमुक्ती यांसारखे अवास्तव आणि पडताळणी न करता येणारे दावे करता येणार नाहीत. उपचारांची भीती दाखवून रुग्णांना आकर्षित करणे, अनावश्यक तपासण्या किंवा शस्त्रक्रियांची मागणी निर्माण करणे आणि औषधे अथवा वैद्यकीय उपकरणांच्या जाहिरातींसाठी स्वतःच्या नावाचा, छायाचित्राचा किंवा व्यावसायिक प्रतिष्ठेचा वापर करून शिफारस करणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
रुग्णांचे अनुभव, उपचारांपूर्वीचे आणि उपचारांनंतरचे छायाचित्र, यशोगाथा किंवा सेलिब्रिटी रुग्णांचा वापर करून वैद्यकीय सेवेचा प्रचार करता येणार नाही. डॉक्टर किंवा रुग्णालयांनी बनावट अथवा पैसे देऊन मिळवलेली रेटिंग, रिव्ह्यू, फॉलोअर्स आणि लाइक्सच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा उंचावण्यासही मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांविरोधात संबंधित राज्य वैद्यकीय परिषदेकडून कारवाई केली जाऊ शकते. पहिल्या उल्लंघनासाठी इशारा आणि नीतिमत्तेचे प्रशिक्षण, दुसऱ्या उल्लंघनासाठी तंबी व आर्थिक दंड, तर तिसऱ्या उल्लंघनासाठी तीन ते सहा महिन्यांपर्यंत नोंदणी निलंबित करण्याची तरतूद मार्गदर्शक सूचनांमध्ये आहे. गंभीर प्रकरणांत सहा ते १२ महिने नोंदणी निलंबित करणे, तर वारंवार उल्लंघन झाल्यास एक ते तीन वर्षांसाठी वैद्यकीय नोंदणीतून नाव वगळण्याची कारवाई होऊ शकते. कारवाईपूर्वी संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देऊन बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे.
वैद्यकीय क्षेत्राचे म्हणणे काय ?
हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ. संजय पाटील यांनी याविषयीची अधिक माहिती दिली, या मार्गदर्शक सूचना पूर्वीपासुनच होत्या, मात्र, आता समाज माध्यमांवर जी जाहिरातबाजी होत आहे, त्याचाही या यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, ज्या नॉन डॉक्टर ॲग्रिगेटर कंपन्या डॉक्टरांच्या जाहिराती करतात, त्यांना या नियमांमध्ये कसे समाविष्ट केले जाणार, या बाबत संभ्रम आहे.
महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणतात, सध्या अनेक संस्था टेलिमार्केटिंगच्या माध्यमातून जाहीरातबाजी करीत आहेत. वास्तविक या मार्गदर्शक सूचनांमध्ये या बाबीला अटकाव करण्यात आला आहे. दुसरे म्हणजे या मार्गदर्शक सूचना सर्व वैद्यकीय शाखांना लागू व्हाव्यात, केवळ ॲलोपथीच्या डॉक्टरांसाठी या मार्गदर्शक सूचना नसाव्यात.
जाहिरात करताना काय टाळावे?
- ‘सर्वोत्तम डॉक्टर’, ‘१०० टक्के यश’ आणि ‘हमखास उपचार’ असे दावे.
- रुग्णांचे फोटो, उपचारांच्या यशोगाथा आणि प्रशंसापत्रांचा प्रचारासाठी वापर.
- बनावट रिव्ह्यू, रेटिंग, फॉलोअर्स आणि लाइक्सचा वापर.
- रुग्णांना आकर्षित करण्यासाठी अनावश्यक तपासण्या व उपचारांना प्रोत्साहन.
- औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा व्यावसायिक उत्पादनांची जाहिरातीसाठी शिफारस.
