पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (एनएमएमएस) शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली आहे.  परीक्षेचा निकाल आणि निवडयादी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, जिल्ह्यांना, शाळांना आणि विद्यार्थ्यांना निकाल, निवडयादी संकेतस्थद्वारे घेता येणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा झाली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची यादी  २४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना, पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक या बाबत दुरुस्ती असल्यास त्यात ५ मार्चपर्यंत परीक्षा परिषदेकडे ऑनलाइन स्वरुपात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थी, पालकांनी शाळेमार्फत पाठवलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली.

यंदा २ लाख ५० हजार ७४५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्यासाठी ११ हजार ६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालयाने निश्चित केला आहे. राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इयत्त सातवी, आठवीची विद्याच्यर्थी संख्या,  १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थी संख्येच्या आधारे जिल्ह्यानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन २००७-०८पासून केंद्र सरकारमार्फत आयोजित करण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. शिष्यवृत्तीप्राप्त प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. विद्यार्थ्यांना सन २०१७-१८ पासून  दरमहा एक हजार रुपये या प्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.

नववी ते बारावी या चार वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळते. यंदाच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी आणि गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत केले जाते, असे स्पष्ट करण्यात आले.