scorecardresearch

घोटाळेबाज नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहकच मिळेना; पुन्हा होणार लिलाव, कर्ज आणि फ्लॅटची रक्कम किती?

नीरव मोदी याचे पुण्यातील दोन फ्लॅट विकून पीएनबी बँकेच्या कर्जाची वसूली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

nirav modi
घोटाळेबाज नीरव मोदी

देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यावर ११ हजार ५०० कोटी रुपयांचा पीएनबी (PNB) घोटाळ्याचा आरोप आहे. हे पैसे वसूल करण्यासाठी पीएनबीने मोदीच्या १८ कोटी रुपयांचे दोन फ्लॅट लिलावाच्या माध्यमातून विकण्याचा प्रयत्न केला. यासाठी तीन फेब्रुवारी रोजी लिलाव पार पडला. मात्र लिलावाची ही प्रक्रिया निष्फळ ठरली. कारण या प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी कोणीही रस दाखवला नाही. कर्ज वसूली न्यायाधिकरण प्रथमचे (DRT – I) मुंबई येथील अधिकारी आशू कुमार यांनी नीरव मोदी याच्या दोन प्रॉपर्टीचा दर कमी करुन पुन्हा त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा >> अदाणी-हिंडेनबर्ग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मोदीवर एकूण कर्ज आणि फ्लॅटची किंमत?

नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव करुन २० मार्च २०२३ पर्यंत पीएनबी बँकेला ११ हजार ७७७ कोटींच्या कर्जाचा काही हिस्सा वसूल करायचा आहे. फेब्रुवारी पर्यंत पीएनबीचे एकूण कर्ज ११ हजार ६५३ कोटींचे होईल, ज्यामध्ये २० मार्च ला १२४ कोटींची आणखी भर पडणार आहे. लिलाव पार पडत असलेल्या प्रॉपर्टीमध्ये पुणे येथील फ्लॅट नं. १६०१ आणि १६०२, एफ १ इमारत, १६ वा मजला, युपणे हाऊसिंग स्किम, हडपसर येथील दोन फ्लॅटचा समावेश आहे. या फ्लॅटचे क्षेत्रफळ हे ३९८ स्क्वे.मी. आणि ३९५ स्क्वे. मी. असे आहे. तर या फ्लॅटची किंमत अनुक्रमे ८.१० आणि ८.०४ कोटी अशी आहे. २० मार्च रोजी दरामध्ये घट करुन पुन्हा लिलाव केला जाईल.

मोदीच्या कंपन्यांना नोटीस

डीआरटी ने ९ फेब्रुवारी रोजी डिफॉल्टर कंपनी स्टेलर डायमंड्स, सोलर एक्सपोर्ट्स, डायमंड आर युएस, एएनएम एंटरप्राइजेस प्रा. लि., एनडीएम एंटरप्राइजेस प्रा. लि. यांना नोटीस पाठवली आहे. तसेच या कंपन्यांचे मालक, प्रवर्तक नीरव डी. मोदी, अमी नीरव मोदी, रोहिनी न. मोदी, अनन्या नी. मोदी, अप्श नी. मोदी, पुर्वी मयांक मेहता, दिपक के. मोदी, निशाल डी. मोदी आणि नेहल डी. मोदी यांना देखील नोटीस पाठविली आहे. या लोकांना पीएनबीचे तब्बल ७ हजार ०२९ कोटी रुपयांचे कर्जदार म्हणून घोषित करत ही नोटीस देण्यात आली आहे.

हे वाचा >> सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परतणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “तुला काँग्रेसशिवाय करमणार नाही आणि आम्हाला…”

२०१८ साली घोटाळा उघड झाला

पीएनबीच्या तक्रारीनंतर सीबीआयने १४ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या घोटाळ्याचा गुन्हा जानेवारी २०१८ मध्ये दाखल केला होता. यानंतर ईडी, प्राप्तिकर विभाग यासारख्या यंत्रणांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले. केंद्रीय यंत्रणांनी या घोटाळ्यात नीरव मोदी आणि त्यांचे नातेवाईक मेहुल चोक्सी यांना प्रमुख आरोपी असल्याचे सांगितले. नीरव मोदी सध्या लंडन येथे असून चोक्सी वेस्ट विडिंजमधील अँटेगुवा आणि बारबुडा बेटांच्या समूहाचे नागरिकत्व घेऊन तिथे राहत आहे. दोघांनाही भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2023 at 13:11 IST

संबंधित बातम्या