डब्यामध्ये सिगारेट किंवा इतर काही कारणांनी आग लागल्यास धोका अधिक वाढविण्यास कारणीभूत ठरणारे रेल्वेच्या डब्यांमधील अंतर्गत कापडी पडदे काढण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वे गाडय़ांमधील टु- टायर व थ्री- टायर वातानुकूलित डब्यांमध्ये पडदे लावण्यात येणार नाहीत.
वातानुकूलित डब्यांमध्ये अंतर्गत विभागांसाठी कापडी पडदे लावले जातात. या डब्यांमध्ये धूम्रपानास बंदी आहे. मात्र, नियमाचा भंग करून अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी धूम्रपान करीत असतात. सिगारेटचा पेटता तुकडा पडून किंवा पेटती काडी पडल्याने या पडद्यांना आग लागू शकते. अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. आतील पडद्यांमुळे आग आणखी भडकून प्रवाशांचे बळीही गेले आहेत. त्याशिवाय शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांनीही आग लागू शकते. अशा वेळी कापडी पडदे आगीची तीव्रता वाढविण्यास कारणीभूत ठरतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वातानुकूलित डब्यातील खिडक्यांचे पडदे वगळता इतर अंतर्गत पडदे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा म्हणाल्या की, रेल्वे बोर्डाने हा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुर्घटनेला आळा बसण्यास मदत होईल. काही प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडतात. या एका साध्या निर्णयाने अशा दुर्घटना टाळण्यास मदत होईल. या पडद्यांना जेवणाचे डबे पुसणे किंवा बूट पुसण्याचेही प्रकार होत होते. त्यामुळे हे पडदे काढणेच योग्य होते. पडदे काढण्याच्या निर्णयाबरोबरच दोन डब्यांमधील कफिलगही अग्निरोधक करणे गरजेचे आहे.