अडीच महिन्यांत एकही शस्त्रक्रिया नाही

पुणे : करोनामुळे नेत्रदानाची टाळेबंदी झाली असून गेल्या अडीच महिन्यांत शहरामध्ये नेत्र प्रत्यारोपणाची एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. मूत्रपिंड आणि यकृत याप्रमाणे नेत्राचा अवयवामध्ये समावेश आहे. सध्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला परवानगी नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत असली तरी त्याचा विपरीत परिणाम नेत्रदानावर झाला आहे. गेल्या अडीच महिन्यांमध्ये एकही नेत्रदान झालेले नाही. तर, दुसरीकडे बुब्बुळाची (कॉर्निया) आवश्यकता असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी जवळपास पाचशेच्या घरात आहे. साधारणपणे पुण्यामध्ये दरवर्षी दोनशेहून अधिक नेत्रदानासाठीच्या शस्त्रक्रिया होत असतात. मात्र, करोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून यामध्ये खंड पडला असल्याची माहिती नेत्रतज्त्रांनी दिली.

ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि राष्ट्रीय नेत्र चिकित्सालयाचे संचालक डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले, करोना प्रादुर्भावाचा फटका नेत्रदान चळवळीला बसला आहे. नेत्रदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती व्यक्ती करोनाबाधित असण्याच्या शक्यतेमुळे गेल्या अडीच महिन्यांत नेत्रदान झालेले नाही. तसेच नेत्रदानाच्या शस्त्रक्रियाही झालेल्या नाहीत. मात्र, मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या अन्य शस्त्रक्रिया नियमितपणे होत आहेत.

रुबी हॉल क्लिनिक आय बँकेच्या संचालक डॉ. संगीता वाघ म्हणाल्या, करोनामुळे सध्या नेत्रदान स्थगित ठेवण्यात आले आहे. किडनी आणि यकृत याप्रमाणे नेत्र हा देखील शरीराचा एक अवयव मानला जातो. सध्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे नेत्रदानाच्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. नेत्रदात्याची करोना चाचणी करण्याची परवानगी नसल्यामुळे अडीच महिन्यांत नेत्रदान झालेले नाही.

शीतगृहामध्ये ठेवण्यात आलेल्या पार्थिवाचे नेत्र दृष्टिहीन व्यक्तीस देण्यामध्ये करोना होण्याचा धोका आहे की नाही हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पूना आय केअरचे संचालक डॉ. नितीन कोलते म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय नेत्रतज्ज्ञ संघटनेने राबविलेल्या ‘हॉस्पिटल कॉर्निया र्रिटायव्हल प्रोग्राम’अंतर्गत रुग्णालयामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाचे नेत्र घेता येऊ शकतात. मात्र, हा रुग्ण करोना बाधित नसावा, असे त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव ध्यानात घेता नेत्रदान करण्यापूर्वी संबंधित पार्थिवाची करोना चाचणी करावी लागेल. त्याचा खर्च कोणी करायचा हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे कदाचित नेत्र संकलनाचे प्रमाण अत्यल्प असू शकेल.

पुणे जिल्ह्य़ाची कामगिरी

(मार्चअखेरीस संपलेल्या वर्षभराचा आलेख)

* नेत्रसंकलन – १५३६

* नेत्रदान –     ७६१

रुग्णांची प्रतीक्षा यादी –    ५००