पुणे : चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचे पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> करोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार; ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे? याचा भारताला धोका किती?

आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले, ‘मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) श्वसन संसर्गास कारणीभूत ठरतो. हा विषाणू पहिल्यांदा नेदरलँडसमध्ये २००१ मध्ये आढळला. हा एक सामान्य श्वसन विषाणू असून, तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी साथरोग आहे आणि फ्ल्यूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. राज्यात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.’

हेही वाचा >>> जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नायलॉन मांजा विक्रेत्यंना पकडले

एचएमपीव्हीचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. राज्यात २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये श्वसन संसर्गात कोणतीही वाढ झालेली दिसून आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी श्वसनविकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> सराइताला जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे; आरोपीकडून बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका जप्त

हे करा…

– खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

– साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा.

– ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

– भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.

– संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन ठेवा.

हे करू नका…

– हस्तांदोलन

– टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर

– आजारी लोकांशी जवळचा संपर्क

– डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श

– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे चीनमध्ये एचएमपीव्ही साथरोगाचा संसर्ग सुरू असून, त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी-खोकला रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करावेत. – डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No hmpv cases in maharashtra health department clarifies pune print news stj 05 zws