केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतरही पुणे मेट्रो प्रकल्पाला राज्य शासनाच्या अंतरिम अंदाजपत्रकात मात्र आर्थिक तरतूद करण्यात आलेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाला या अंदाजपत्रकात मोठी तरतूद होईल अशी शक्यता वाटत असतानाच तरतूद न झाल्यामुळे मेट्रो पुन्हा चर्चेत आली आहे.
वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते निगडी या दोन मेट्रो मार्गाना केंद्राने मंजुरी दिली असून दोन्ही मार्गाची लांबी एकतीस किलोमीटर आहे. या दोन्ही मार्गासाठीचा अपेक्षित खर्च दहा हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये एवढा आहे. या शिवाय स्वारगेट ते कात्रज या पंधरा किलोमीटर लांबीच्या वाढीव मेट्रो मार्गालाही तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
मेट्रोच्या पुढील टप्प्यात केंद्र व राज्याकडून या प्रकल्पासाठी निधी मिळणे अपेक्षित असून त्यादृष्टीने राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, अशी शक्यता वाटत होती. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकात मेट्रो प्रकल्पाचा सुधारित प्रकल्प अहवाल केंद्राकडे अर्थसाहाय्य मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे राज्याने पुणे मेट्रोसाठी तरतूद केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.