कोणालाही अवघड वाटेल असाच मुळात त्या अध्ययन वर्गाचा विषय आहे.. शिवाय वर्गासाठी कोणतीही प्रवेश प्रक्रिया नाही, नोंदणीची भानगड नाही, शुल्कही नाही, ठराविक अभ्यासक्रम नाही त्यामुळे ‘पोर्शन’ संपवण्याची घाई नाही, परीक्षाही नाही.. त्यामुळे स्पर्धा, यश, अपयश-प्रशस्तिपत्र असाही प्रकार नाही.. तरीही तो अध्ययन वर्ग बुद्धिवान, अभ्यासू आणि जिज्ञासूंसाठी पर्वणीच ठरला आहे.
एकेका विषयाला वाहून घेतलेली जशी अनेक माणसे पुण्यात आहेत तशाच संस्थाही आहेत. वैदिक संशोधन मंडळ ही अशीच एक संस्था. सध्याच्या समाजव्यवस्थेतही प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास करावा, ते विचार समजून घ्यावेत अशी ओढ असलेले जिज्ञासू आजही मोठय़ा संख्येने आहेत. अध्यात्माची आवडही समाजात वाढत आहे. केवळ ज्येष्ठ वा निवृत्त मंडळीच या अभ्यासाकडे वळलेली नाहीत, तर तरुणांमध्येही या विषयाची गोडी असल्याचे चित्र आहे. हे चित्र लक्षात घेऊन उपनिषद अध्ययन वर्ग हा उपक्रम वैदिक संशोधन मंडळाने सुरू केला.
प्राचीन ग्रंथांची आवड, जिज्ञासा, उत्सुकता अशा अनेकविध हेतूंनी या वर्गात विविध वयोगटातील मंडळी सहभागी होत असल्याचा अनुभव भाग्यश्री पाटसकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. त्या संस्थेच्या संचालक म्हणून गेली सोळा वर्षे काम करत आहेत आणि उपनिषद अध्ययन वर्ग ही कल्पनाही त्यांचीच. ‘‘उपनिषदांचे वाचन, विविध भाष्यकार व विचारवंतांच्या अभ्यासाला धरून उपनिषदांचे विवरण, चर्चा व मुक्तचिंतन असे या वर्गाचे आगळे-वेगळे स्वरूप आहे. त्यामुळे वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया, शुल्क, परीक्षा वगैरे कोणत्याही औपचारिक पद्धती नाहीत. असे काही करायचे नाही असे ठरवूनच आम्ही हा उपक्रम सुरू केला. एखादा अभ्यासक्रम चालवण्याच्या प्रचलित सर्व पद्धती बाजूला ठेवून आम्ही एखादा अभ्यासक्रम चालवू शकतो का असा विचार करूनच हा वर्ग सुरू केला आणि तो सुरू करण्यासाठी संस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष डॉ. सरोजा भाटे यांनी माझा उत्साह वाढवणारे पाठबळ मला दिले’’ असेही पाटसकर यांनी आवर्जून सांगितले. या वर्गाचे संयोजन आणि अध्यापनाची जबाबदारीही पाटसकर यांच्यावरच आहे.
ईश, केन आणि कठ या तीन उपनिषदांचे अध्ययन या वर्गामध्ये आतापर्यंत पूर्ण झाले असून प्रश्न उपनिषदाचा अध्ययन वर्ग नुकताच सुरू झाला आहे. सुशिक्षितांमध्ये, उच्चशिक्षितांमध्ये गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषद यांच्या अभ्यासाची ओढ असल्याचे चित्र दिसते. काही मंडळी अशीही असतात की त्यांना अवघड विषय शिकायला आवडते. अशा सर्वासाठीच हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचा पाटसकर यांचा अनुभव आहे. आपल्या अवतीभोवती घडत असलेल्या गोष्टींकडे कसे बघावे याचे ज्ञान उपनिषदांमधून मिळते. त्यामुळे त्यांचे महत्त्व या अध्ययन वर्गात येणाऱ्यांना सहजच लक्षात येते, असेही त्या म्हणाल्या. मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनीत वैदिक संशोधन संस्था असून दर शुक्रवारी दुपारी चार ते सव्वापाच अशी या अध्ययन वर्गाची निश्चित वेळ आहे. वर्गातील सहभागासाठी ९३७१२३०२८७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
अनेकांनी गीता वाचलेली असते. गीतेत येणारे उपनिषदांचे संदर्भ पाहिल्यानंतर अनेकांना उपनिषदांचा अभ्यास करावासा वाटतो, काहीजण संस्कृतवरील श्रद्धेतून या अध्ययन वर्गाकडे वळतात, बुद्धिमान वा जिज्ञासूंना विविध विषयांचे ज्ञान मिळावे अशी ओढ असते, त्या ओढीतून ते वर्गाकडे वळतात, असेही निरीक्षण पाटसकर नोंदवतात.