पुणे : जगभरातील बहुतेक देशांत करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा (बुस्टर डोस) दिली जात आहे. प्रवासासाठी वर्धक मात्रा आवश्यक आहे. केंद्रांकडून पुढील काही दिवसांत वर्धक मात्रेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. लसमात्रांची कमतरता पडणार नाही इतके उत्पादन होत आहे, अशी भूमिका सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सोमवारी मांडली.
पुणे पर्यायी इंधन परिषदेतील सत्रानंतर पूनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्राकडे वर्धक मात्रेची मागणी केली आहे. केंद्राकडून त्याबाबतचे धोरण ठरवण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे पूनावाला यांनी नमूद केले. जगभरातील बहुतेक देशांमध्ये वर्धक मात्रा दिली जात असल्याने आपल्या देशातही त्याबाबतचा निर्णय होणे आवश्यक आहे. वर्धक मात्रा घेतल्यास करोनाच्या कोणत्याही उत्परिवर्तनावर ती परिणामकारक ठरू शकेल, असेही पूनावाला यांनी सांगितले. लशींचे मिश्रण करण्याबाबत सरकारकडून वैज्ञानिक मार्गदर्शन घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
अमेरिका, युरोप आदी देशांत मोठय़ा प्रमाणात करोना रुग्णसंख्या आहे. मात्र आपल्या देशात योग्य लशीची निवड केल्यामुळे करोना रुग्णसंख्या कमी झाल्याचे पूनावाला यांनी नमूद केले