मी बीफ खात नाही, मात्र ज्यांना बीफ खायचं आहे त्यांना ते खाण्याची परवानगी असली पाहिजे त्यावर कोणीही बंदी घालू शकत नाही. गोरक्षणाच्या नावाखाली देशात जो हिंसाचार चालला आहे तो गैर आहे.  कथित  गो रक्षकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. याच कार्यक्रमात त्यांनी इतर मुद्द्यांवरही आपली मतं मांडली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आठवले बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच रामदास आठवले यांनी असेच वक्तव्य केले होते आणि नंतर थोड्या दिवसांनी हिंदुंच्या भावना गायीशी जोडल्या असल्यामुळे लोकांनी गोमांस खाऊ नये असं परस्परविरोधी मतही मांडलं होतं. आता आज पुन्हा एकदा बीफ खाणाऱ्यांना आपण रोखू शकत नाही असं आठवले यांनी म्हटलं आहे.

जुलै महिन्यात गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी बीफ खाण्याला विरोध दर्शवला होता, तर त्याआधी बीफ खाण्यात काहीही गैर नसल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा बीफ खाणाऱ्यांना रोखू शकत नाही म्हणत रामदास आठवले यांनी घूमजाव केलं आहे. आता यावर भाजप काही भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आज झालेल्या कार्यक्रमात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं.

ते वक्तव्य प्रोत्साहन देण्यासाठी
तृतीयपंथियांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलं असता मी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोललो आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

देशात गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या मारहाणीचा आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंचा मुद्दा गाजतो आहे. अशात आता रामदास आठवले यांनी बीफवरून आपली भूमिका तिसऱ्यांदा बदलली आहे. केंद्रातून किंवा राज्य सरकारच्या वतीनं कोणी आठवलेंना उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे.