उमेदवारी चुकल्यास भडका उडण्याची दाट शक्यता

पुणे महापालिकेत ‘स्वीकृत’ नगरसेवकपदाच्या नियुक्तीवरून सत्तारूढ भारतीय जनता पक्षात प्रचंड राडा झाला, त्याची पिंपरीतील भाजप नेत्यांनीही चांगलीच धास्ती घेतली आहे. पक्षातील नव्या-जुन्यांचा संघर्ष, निष्ठावंतांची कापलेली तिकिटे, नव्या मंडळींचे वाढलेले प्रस्थ आणि जुन्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न, नेत्यांची गटबाजी अन् वरिष्ठ नेत्यांचा नको तितका हस्तक्षेप यांसारख्या अनेक कारणांमुळे पक्षात प्रचंड धुसफूस सुरू आहे. त्यातच ‘स्वीकृत’ची निवड चुकल्यास पिंपरीतही भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तापलेल्या वातावरणात प्रदेश कार्यकारिणीची बैठक शहरात होत असल्याने वादग्रस्त ठरू शकणारा पिंपरीतील स्वीकृतचा विषय महिनाभर लांबणीवर टाकण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेत १२८ पैकी ७७ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. पक्षीय बलानुसार स्वीकृतच्या तीन जागांवर भाजपची वर्णी लागणार आहे. जवळपास १०० कार्यकर्ते इच्छुक आहेत. मात्र, गांभीर्याने विचार होईल, अशी २० ते २५ नावांची पक्षवर्तुळात चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी खासदार गजानन बाबर, माजी महापौर आझम पानसरे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन अशा अनेकांकडे इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावली आहे. जागा कमी व इच्छुक जास्त असल्याने स्वीकृतसाठी तीव्र स्पर्धा आहे. अनेकांची तिकिटे कापण्यात आली, ते आशेवर आहेत. काहींना निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला, त्यांना आपली वर्णी लागेल, असे वाटते. बंडखोरी करू शकणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘शब्द’ देऊन थांबवण्यात आले होते. मोठय़ा नेत्यांच्या ‘गुड बुक’मध्ये असणाऱ्या काही स्थानिक नेत्यांनी स्वत:ची वर्णी लावून घेण्यासाठी कोणतीही कसूर सोडलेली नाही. नेत्यांच्या कुटुंबातील अनेक नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अनेकांचा स्वीकृतवर डोळा आहे. नेत्यांना निर्णय घेणे अवघड आहे. कोणत्याही नावावर एकमत होण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या शीतयुद्धाचा फटका बसल्याने पुण्यात जो राडा झाला, त्याची पुनरावृत्ती पिंपरीत होण्याची शक्यता बिलकूल नाकारता येणार नाही. किंबहुना, पिंपरीतील नेत्यांना आता तीच धास्ती लागून राहिली आहे.

२० एप्रिलला पिंपरीतील स्वीकृतची निवड होणार होती. मात्र, प्रदेश कार्यकारिणी बैठक चिंचवडला घेण्याचे नियोजन होते म्हणून महिनाभर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. येत्या २० मे ला ही नावे जाहीर करण्यात येणार आहेत. महिनाभराचा अवकाश असला, तरी इच्छुकांनी प्रचंड मोर्चेबांधणी सुरू केली आहे. चिंचवडला २६ व २७ एप्रिलला भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह राज्य भाजपमधील सर्व प्रमुख नेत्यांची हजेरी या बैठकीत राहणार आहे. स्वीकृतच्या इच्छुकांचे भवितव्य या बैठकीतच ठरणार आहे.