scorecardresearch

चिंचवड मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस

२०१९ च्या निवडणुकीत चिंचवडमध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहे.

Notice to BJP candidate Ashwini Jagtap from Chinchwad Constituency in 'Paid News' case
चिंचवड मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता भंगाच्या आलेल्या दहा तक्रारींवर कारवाई करण्यात आली असून, भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या मतदार संघातील पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून सुमारे ४३ लाख रूपयांची रोकड, चार लाख ९७ हजार ६२५ रुपये किमतीचे मद्य आणि ९४ हजार ७५० रुपयांचा ३ किलो ५८४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार ९४६ पुरुष, तर दोन  लाख ६५ हजार ९७४ महिला आणि तृतीयपंथी ३४ मतदार आहेत. दिव्यांग १२ हजार ३१३,  ८० वर्षांवरील मतदारांची संख्या ९ हजार ९२६ आहे. तसेच अनिवासी भारतीय ३३१, सैनिक मतदार १६८ या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत. मतदानासाठी ५१० मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत.

हेही वाचा >>> शिवसेना ठाकरे गटाच्या पिंपरी महिला संघटिकेसह ८ जणांची हकालपट्टी

मतदारांना मतदान प्रकियेमध्ये सुलभरित्या सहभागी होता यावे. यासाठी या सर्व मतदान केंद्रांवर किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मतदार संघामध्ये १३ मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. एकूण मतदान केंद्राच्या दहा टक्के मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. त्यात संवेदनशील मतदान केंद्राचाही समावेश करण्यात आला आहे. २०१९ च्या निवडणुकीत चिंचवडमध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहे. पोटनिवडणुकीची मतमोजणी थेरगावातील कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे होईल. मतमोजणीसाठी १४ टेबल असतील. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या होतील.

हेही वाचा >>> शिवनेरीवरील भगव्या ध्वजाच्या मागणासाठी पुढील वर्षी राज्यव्यापी आंदोलन, डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

या निवडणूक प्रकियेच्या संचालनाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत दोन सर्वसाधारण निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक व दोन खर्च निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दोन हजार ५५० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण झाले. ४७ अधिकाऱ्यांची तसेच संवेदनशील मतदान केंद्रासाठी १५ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, निवडणूक प्रकिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपीच्या प्रत्येकी एक कंपनी आरपीएफच्या दोन कंपन्या दाखल झालेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून मतदार संघासाठी ८३६ पोलीस व १६९ होमगार्ड मार्फत बंदोबस्त पुरविला जाणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 16:43 IST