शाळेच्या स्थलांतराची परवानगी न घेताच दुसऱ्या पत्त्यावर शाळा चालवल्या प्रकरणी शिक्षण विभागाने विद्याव्हॅली शाळेला नोटीस दिली असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र का रद्द करण्यात येऊ नये, अशी नोटीस देण्यात आली आहे.
विद्याव्हॅली शाळेसाठी बाणेर रस्ता येथे जागा देण्यात आली होती. मात्र, सध्या ही शाळा सूस गाव येथे भरवली जाते. शाळेच्या स्थलांतराचा कोणताही प्रस्ताव नाही. त्याचप्रमाणे सूस गाव ग्रामपंचायत आणि मुळशी पंचायत समितीने ही शाळा बंद करण्याचा ठराव केला होता. या पाश्र्वभूमीवर ही शाळा नोंदणी केलेल्या पत्त्यावरच चालवण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली होती. नोंदणी केलेल्या पत्त्यावर शाळा का चालवण्यात येत नाही, अशी विचारणी विभागाने केली आहे. त्याचप्रमाणे शाळेने आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. उत्तर देण्यासाठी शाळेला आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. शाळेच्या उत्तरानंतर पुढील कार्यवाही ठरवण्यात येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.