scorecardresearch

पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता स्मार्ट ओळखपत्र

आधार कार्डशी संबंधित ही हजेरी प्रणाली असून स्मार्ट ओळखपत्रांची खरेदी विद्युत विभागाकडून केली जाणार

पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता स्मार्ट ओळखपत्र
पुणे महानगर पालिका (संग्रहीत छायाचित्र)

महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रात सुसूत्रता आणण्यासाठी स्मार्ट ओळखपत्र देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आधार कार्डशी संबंधित ही हजेरी प्रणाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्रांची खरेदी विद्युत विभागाकडून केली जाणार आहे. स्मार्ट ओळखपत्र सर्वांना बंधनकारक करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रसिद्ध केले आहेत.

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन हजेरी प्रणाली सुरू कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्य इमारतीमध्ये विविध ठिकाणी बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.

दैनंदिन हजेरी प्रणालीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती –

स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध होईपर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आधारकार्ड नंबरमधील शेवटचे आठ अंक बायोमॅट्रीक यंत्रामध्ये नोंदवून आंगठ्याचा ठसा उमटवून हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. दैंनदिन हजेरी प्रणाली कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनपत्रकास जोडण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील पूर्वतयारी माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, ई-प्रशासन विभागाने मुख्य विद्युत विभागाशी संपर्क साधून करावी आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणालीबाबत काही आक्षेप असल्यास विद्युत विभागाशी संपर्क साधावा, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी या आदेशात नमूद केले आहे. विभाग प्रमुख, खातेप्रमुखांनी दैनंदिन हजेरी प्रणालीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावयाची आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या