पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील युद्धामुळे नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. एवढ्यावरच न थांबता केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात दुपटी होऊन अधिक वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) मोठे पाऊल उचलले आहे. बाजाराने आता सुवर्ण खरेदी योजनेची घोषणा केली असून त्यास प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स ( ईजीआर) ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत गुंतवणूकदार सेबी नोंदणीकृत व्हॉल्ट्समधील सोन्याची इलेक्ट्रॉनिक रूपात खरेदी आणि विक्री करू शकतात. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सचे व्यवहार समभागांप्रमाणेच होतात आणि त्यांची खरेदी-विक्री करता येते अथवा ते आपल्या डिमॅट खात्यात ठेवता येतात. गरज पडेल त्यावेळी या इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सचे रुपांतर भौतिक सोन्यातही करता येते. म्हणजेच त्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष सोने ही खरेदी करू शकता. अगदी शंभर मिलिग्रॅमपासून हे व्यवहार करता येतात.

राष्ट्रीय शेअर बाजाराने १८ मेपासून इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स विभागातील थेट व्यवहाराला सुरुवात केली आहे. त्याआधी १६ मे रोजी या व्यवहारांची व्यापक व्यवहार चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. या चाचणीदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण अथवा प्रणालीतील त्रुटी समोर आली नाही. त्यानंतर १८ मेपासून थेट व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले असून, सर्व प्रणाली नियोजनानुसार कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सला बाजारातील सहभागी, मध्यस्थ संस्था आणि गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स योजना

अहमदाबाद आणि मुंबई येथे सोने व्हॉल्टिंग व कलेक्शन सेंटर

दिल्ली, कोलकता, चेन्नई आणि बंगळुरू येथील आणखी चार केंद्रे

आगामी काळात टप्प्याटप्प्याने देशभरात १२० केंद्रांचे जाळे उभारण्याची योजना

इतर शहरांतील केंद्रांची घोषणा लवकरच

राष्ट्रीय शेअर बाजाराचा विस्तार

राष्ट्रीय शेअर बाजार हा देशातील स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक व्यवहार प्रणाली सुरू करणारे पहिला भांडवली बाजार आहे. १९९४ मध्ये कार्यरत झालेल्या या बाजाराने ‘सेबी’च्या आकडेवारीनुसार १९९५ पासून एकूण समभाग व्यवहार आणि सरासरी दैनिक उलाढालीच्या बाबतीत देशातील सर्वांत मोठा भांडवली बाजार म्हणून स्थान कायम राखले आहे. ‘फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन’च्या २०२५ मधील आकडेवारीनुसार व्यवहारांच्या संख्येच्या आधारावर राष्ट्रीय शेअर बाजार हा जगातील सर्वांत मोठा वायदे बाजार ठरला आहे. तसेच, ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजेस’च्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये समभाग व्यवहारांच्या संख्येनुसार राष्ट्रीय शेअर बाजाराला जागतिक पातळीवर तिसरे स्थान मिळाले आहे.