पुणे : गेल्या काही वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाची रुग्णसंख्या जास्त दिसून येत आहे. याचबरोबर उपचार घेऊनही रुग्ण दगावण्याचे प्रकारही गेल्या वर्षी घडले होते. यंदाही गडचिरोलीमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे आरोग्य विभागाने हिवतापाचा प्रकोप गडचिरोलीमध्ये का होत आहे, हे शोधण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) विनंती केली आहे. यामुळे गडचिरोलीतील हिवतापाचे गूढ उलगडण्यास मदत होणार आहे.

गडचिरोली जिल्हा हा दुर्गम आणि जंगली भागाचा आहे. या जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असते. गडचिरोलीत कीटकजन्य आजारांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यातही हिवतापाची रुग्णसंख्या अधिक असते. राज्यात गडचिरोलीमध्ये हिवतापाची रुग्णसंख्या सर्वाधिक नोंदविण्यात येते. गेल्या वर्षी औषधोपचार करूनही हिवतापाच्या तीन रुग्णांचा तिथे मृत्यू झाला होता. त्यामुळे गडचिरोली भागात हिवतापाच्या नवीन प्रकाराचा प्रसार झाल्याची शंका व्यक्त होत आहे. याचबरोबर हिवतापाचा हा प्रकार औषधांना जुमानत नसल्याची बाबही समोर आली आहे.

आणखी वाचा-शहरबात : अपुऱ्या सुविधांचे उद्योगांना ग्रहण

आरोग्य विभागाच्या नुकत्याच झालेल्या दिल्लीतील बैठकीत गडचिरोलीतील हिवतापाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी गडचिरोलीच्या शेजारील भागात तेलंगण आणि छत्तीसगड राज्यातही अशाच प्रकारे हिवतापाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेला याबाबत संशोधन करण्याची विनंती केली आहे. परिषदेने संशोधन केल्यानंतर या भागात हिवतापाचा प्रादुर्भाव वाढण्यामागील नेमकी कारणे समोर येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

गडचिरोलीतील हिवतापाचे रुग्ण

वर्ष रुग्ण मृत्यू
२०१९ २,४२८
२०२०६,४८५
२०२११२,३२६
२०२२९,२०५१३
२०२३५,८६६१०
२०२४ (७ मेपर्यंत)१,१४२

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस पुत्राचा ‘कार’नामा; कारची महिलेला जोरात धडक

गडचिरोलीबाबत आरोग्य विभागाची निरीक्षणे

  • राज्यातील इतर भागापेक्षा हिवतापाचे रुग्ण जास्त
  • औषधोपचार करूनही रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना
  • हिवतापाचा वेगळा प्रकार असण्याची शक्यता
  • हिवतापाचा प्रकार औषधांना दाद देत नसल्याच्या घटना
  • गडचिरोलीशेजारील छत्तीसगड, तेलंगणमधील भागातही हिवतापाचा वाढता प्रादुर्भाव