पुणे : पुण्यात सकाळी आणि सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी नाही, असा रस्ता सापडणे आता दुर्मिळ झाले आहे. कारण पुण्यातील वाहनांची संख्याच एवढ्या प्रमाणात फुगली आहे, की रस्ते अपुरे पडल्यास आश्चर्य वाटायला नको. दरवर्षी पुण्यात सरासरी दोन लाख वाहनांची भर पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यातील एकूण वाहनांची संख्या ४४ लाखांच्या पुढे पोहोचली आहे.

पुण्याचा विचार करता वाहनांमध्ये सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. यंदा जानेवारीअखेर पुण्यातील दुचाकींची एकूण संख्या ३२ लाख ९० हजार ३४७ वर पोहोचली. त्यामुळे आधी सायकलींचे शहर असे ओळख असलेले पुणे दुचाकींचे शहर बनले आहे. एकूण वाहनसंख्येत दुचाकींचे प्रमाण ७५ टक्के आहे. उरलेल्या २५ टक्क्यांमध्ये इतर वाहनांचा समावेश आहे. सन २०१०-११ पासून आकडेवारी पाहिल्यास एकूण वाहनांमध्ये दुचाकींची संख्या दरवर्षी सरासरी दीड लाखाने वाढत आहे. केवळ करोना संकटाच्या काळात दुचाकींची वार्षिक विक्री कमी होऊन एक लाखाच्या आसपास होती. पुण्यातील मोटारींची संख्या ७ लाख ७९ हजार २३७ आहे. २०१०-११ पासून दरवर्षी पुण्यात ४० हजारहून अधिक मोटारींची भर पडत आहे. जानेवारीअखेर प्रवासी टॅक्सींची संख्या ३८ हजार ५२७ आहे. मालमोटारींची संख्या ३७ हजार ४५३ असून, टँकरची संख्या ५ हजार ६९१ आहे. डिलिव्हरी व्हॅनचेही प्रमाण जास्त आहे. चार चाकी डिलिव्हरी व्हॅन ६९ हजार २३६ आणि तीन चाकी डिलिव्हरी व्हॅन ४० हजार ९४६ आहेत. ट्रॅक्टरची संख्या ३३ हजार ३८१ आहे. पुण्यातील रिक्षांची संख्या ९२ हजार ५६१ आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या संख्येने रिक्षा दिसतात. रुग्णवाहिकांची संख्या मात्र, एकूण वाहनसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमध्ये ७३ वर्षीय वृद्धाचा एच ३ एन २ ने बाधित होऊन मृत्यू

मागील काही वर्षांत शहरात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विकासकामांमुळे रस्ते रुंद होण्याऐवजी अरुंद होताना दिसत आहेत. अरुंद रस्ते आणि वाहनांची फुगत चाललेली संख्या यामुळे वाहतूक कोंडी अपरिहार्य बनली आहे. वाहनसंख्या कमी करता येत नाही आणि रस्ते रुंद करता येत नाहीत, अशा कात्रीत यंत्रणा अडकल्या आहेत. यामुळे अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचे प्रयोग सुरू करण्यात आले. हे प्रयोग सुरुवातीच्या काळात यशस्वी झाले. मात्र, आता एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यांवरही सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी कोंडी दिसू लागली आहे.

वाहनांची संख्या नियंत्रणात आणणे आमच्या हाती नाही. याबाबत आम्हाला कोणतेही अधिकार नाहीत. मात्र, वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी इतर सरकारी यंत्रणांशी समन्वयातून काम सुरू आहे. कोंडी होणारी ठिकाणे निश्चित करून तिथे उपाययोजना केल्या जाणार आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे म्हणाले.

हेही वाचा – लाखो वाहनचालकांना दंड, पण वसुली थंड; पुण्यात वाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईचे वास्तव

पुण्यातील वाहनसंख्या (३१ जानेवारी २०२३ अखेर)

  • दुचाकी – ३२ लाख ९० हजार ३४७
  • मोटारी – ७ लाख ७९ हजार २३७
  • रिक्षा – ९२ हजार ५६१
  • मालमोटारी – ३७ हजार ४५३
  • रुग्णवाहिका – १ हजार ६३४
  • वाहनसंख्येत दरवर्षी वाढ – २ लाखांहून अधिक