पुणे : ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांवर (ओबीसी) अन्याय होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राखीव जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच तिकीट देण्याची मागणी ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे या वेळी उपस्थित होते.
हाके म्हणाले, ‘राज्य शासनाने २ सप्टेंबरला काढलेला शासकीय अध्यादेश (जीआर) आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे ओबीसी राजकारण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. गाव-गाड्यात आजही ओबीसी समाज दुय्यम स्थानी आहे. या निवडणुकीत ओबीसी समाजाने आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले नाही, तर शिक्षण आणि नोकरीतही ओबीसींवर अन्याय होत राहील. सध्याच्या राजकारणात ठरावीक ओबीसी नेते उरले आहेत. ओबीसींनी आपली ताकद न दाखवल्यास त्यांना हक्काची राजकीय पदेही मिळणार नाहीत.’
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून ओबीसींना डावलून बोगस कुणबी प्रमाणपत्र असलेल्या धनदांडग्यांना उमेदवारी दिली जाणार असेल, तर त्या विरोधात ओबीसींनी एकत्र यायला हवे. विविध नगर परिषदांमध्ये ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात येत आहे का, याकडे बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्याबाबत संबंधित पक्षांना जाब विचारून त्या पक्षाविरोधात निवडणुकीत प्रचार करणार आहे. मूळ ओबीसी उमेदवारांना तिकीट न देणाऱ्या राजकीय पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल,’ असा इशारा हाके यांनी दिला.
‘मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी संघटना समितीचे अध्यक्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेच भाजपचे राज्य प्रभारी आहेत. त्यामुळे बावनकुळे यांनीच ओबीसी समिती श्वेतपत्रिका कधी काढणार आहे, हे स्पष्ट करावे’, असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक नेते ओबीसी जागेवर अतिक्रमण करून कुणबी दाखला घेत आहेत. त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांचे प्रमाण योग्य प्रकारे काढले गेले नाही. सर्वच राजकीय पक्ष ओबीसींची फसवणूक करत आहेत.’
‘मुळशीतील ओबीसी आक्रमक’
मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या ९ पैकी ३ जागा ओबीसींसाठी, तर १ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या सर्व जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच तिकीट देण्याची मागणी ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. राजकीय पक्षांनी मूळ ओबीसींना उमेदवारी न दिल्यास सर्व ९ जागांवर ओबीसी महासंघाचे उमेदवार देण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. महासंघाचे पदाधिकारी भानुदास पानसरे, किसन नांगरे, चंदाताई केदारी, आनंद रोकडे, राजेंद्र नांगरे, विशाल शेळके, महादेव मरगळे, भाऊसाहेब मरगळे, अशोक कांबळे, भाऊसाहेब आखाडे, कृष्णा पानसरे या वेळी उपस्थित होते.
