पुणे : भारतात तरूण वयात मधुमेह आणि लठ्ठपणाचे वाढते प्रमाण हे चिंताजनक असून यामुळे कर्करोगाची जोखीमही वाढत आहे. त्यामुळे मधुमेह व लठ्ठपणाकडे फक्त जीवनशैलीशी निगडीत समस्या म्हणून न बघता गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. केवळ लठ्ठपणामुळे १३ प्रकारच्या कर्करोगांचा धोका असतो, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
जागतिक कर्करोग दिन ४ फेब्रुवारीला आहे. या निमित्त कर्करोगाचे लवकर निदान व उपचाराचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. कर्करोगाच्या धोक्याबाबत नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील आँकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.मिनिष जैन म्हणाले की, चयापचयमधील असंतुलन आणि दीर्घकालीन दाहक स्थिती कर्करोगाच्या पेशींसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीमकारक घटक असून सध्या किमान १३ प्रकारच्या कर्करोगांशी असलेल्या जोखमीशी संबंधित आहे. इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सततच्या दाहक स्थितीला आणखी हातभार लावते आणि कर्करोगाची जोखीम आणखी वाढू शकते.
ते पुढे म्हणाले की, लठ्ठ व सहव्याधी असलेल्या व्यक्तींमध्ये कर्करोगाच्या गाठ जास्त आक्रमक दिसून येते. त्यामुळे कर्करोगाचे उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात. उदाहरण द्यायचे झाले तर लठ्ठ व्यक्तींमध्ये केमोथेरपीवाटे दिलेली औषधे चरबीमध्ये साठवून कालांतराने हळूहळू बाहेर येतात. त्यातून या औषधांची परिणामकारकता कमी होऊ शकते. त्याचबरोबर योग्य औषधांचे प्रमाण निश्चित करणेही अशा परिस्थितीत आव्हानात्मक होते आणि उपचारांना कमी प्रतिसाद मिळाल्यास परिणामांवर प्रभाव पडू शकतो. लठ्ठपणा आणि मधुमेह या आजारांकडे जीवनशैलीशी निगडीत समस्यांपलीकडे पाहणे गरजेचे आहे. योग्य आहार,व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यातील संभाव्य अनेक आजारांची जोखीम आपण कमी करू शकतो.
मानसिक स्वास्थ्यही महत्वाचे निदान प्रक्रियेतील सुधारणा, कर्करोग या आजाराबाबत एकंदर अधिक प्राप्त झालेले ज्ञान आणि आधुनिक उपचार पर्याय यामुळे परिणामांमध्ये आमूलाग्र सुधारणा होत आहेत. मात्र मनाचा कणखरपणा हा दीर्घकालीन चालणाऱ्या कर्करोग उपचारांदरम्यान अतिशय महत्त्वाचा ठरतो. कर्करोग आणि त्याच्याशी निगडीत शस्त्रक्रियेसह उपचार पर्यायांची साहजिकच रूग्णांमध्ये भीती असते. योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ दिल्यास या आव्हानांवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे उपचारांबरोबरच सायको-आँकोलॉजी या संकल्पनेला महत्त्व प्राप्त होत आहे, असे तज्ज्ञांनी नमूद केले.

