पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे महापाैर रवी लांडगे यांच्या कुणबी (इतर मागास प्रवर्ग) या जात प्रमाणपत्रावर सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढाेले-पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ढोले यांना (शुक्रवारी ६ मार्च) सुनावणीसाठी बोलविले आहे.

महापौर रवी लांडगे हे प्रभाग सहा धावडेवस्ती-भगतवस्ती मधून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या आरक्षित जागेवरून निवडणूक लढविली आहे. पुण्यातील मृणाल ढाेले-पाटील यांनी महापौर लांडगे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली हाेती. त्यानुसार समितीने ढोले यांना सुनावणीसाठी शुक्रवारी बोलाविले आहे. याबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या भाजपच्या सहा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या दोन आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या एका नगरसेवकाच्या जात प्रमाणपत्रावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

याबाबत मृणाल ढाेले-पाटील म्हणाले, ७० ते ७५ टक्के ओबीसी आरक्षण मराठा समाजाने गिळकृंत केले आहे. राज्य सरकार अशा लाेकांच्या पाठिशी राहत असल्यामुळे ओबीसींवर अन्याय हाेत आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याेग्य पद्धतीने सुनावणी घ्यावी. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे लढा देणार आहे. माझ्या जात प्रमाणपत्रावर हिंदू-कुणबी असा उल्लेख आहे. त्याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे काेणतीही अडचण नाही, असे महापौर रवी लांडगे म्हणाले.