नियतकालिकांचे टपाल परवाने रद्द

वृत्तपत्रांचे निबंधक कार्यालयात गेली दोन वर्षे अनेक प्रकरणे पडून आहेत.

दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचविण्यात अडसर

पुणे : नियतकालिकांच्या दिवाळी अंकांची अंतिम धावपळ सुरू असतानाच वृत्तपत्र नोंदणी निबंधक (नवी दिल्ली) यांच्याकडून नियतकालिकांचे टपाल परवाने रद्द करण्यात आले आहेत. अद्ययावत प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून अनेक नियतकालिकांना सवलतीच्या दराने पोस्टींग परवाना करण्यास टपाल खात्याने अटकाव केल्यामुळे वाचकांना दिवाळी अंक पोहोचण्यात अडसर निर्माण झाला आहे.

नियतकालिकांना वृत्तपत्रांचे निबंधक म्हणजेच रजिस्ट्रार फॉर न्यूजपेपर्स ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर सवलतीच्या दराने अंक पोहोचविण्याचा परवाना टपाल खाते देते. मात्र, त्या नोंदणी प्रमाणपत्रात झालेले बदल अद्ययावत झाले नसल्याचे कारण देऊन टपाल खात्याने थेट परवाना रद्द करीत कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. नियतकालिकांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा अन्याय दूर व्हावा अशी मागणी मराठी नियतकालिक परिषदेतर्फे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे आणि सरचिटणीस भालचंद्र कुलकर्णी यांनी पुण्याच्या पोस्टमास्तर जनरल जी. मधुमिता दास यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वृत्तपत्रांचे निबंधक कार्यालयात गेली दोन वर्षे अनेक प्रकरणे पडून आहेत. कोणतेही उत्तर मिळत नाही. त्यामुळेच अनेक नियतकालिकांना अद्ययावत प्रमाणपत्रे मिळू शकलेली नाहीत, ही वस्तुस्थिती मधुमिता दास यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. टपाल खाते व वृत्तपत्र नोंदणी हे दोन्ही विभाग केंद्र सरकारचे असल्याने त्यामध्ये समन्वय नसल्यानेच असे प्रसंग वारंवार घडत असून त्याचा निष्कारण त्रास प्रकाशकांना सोसावा लागत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

टपाल खात्याच्या दिल्ली कार्यालयाने असे आदेश दिले आहेत, मात्र याबाबत अधिक माहिती घेऊन व स्पष्टता आणून दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन मधुमिता दास यांनी दिले. याबाबत गेले महिनाभर टपाल खात्याच्या पश्चिम विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मुकुंद बडवे तसेच सहायक पोस्ट मास्तर जनरल ईश्वर पाटील यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून सदरच्या दिल्ली आदेशामध्ये संदिग्धता असल्याचे कळवून देखील ही कारवाई थांबलेली नाही, असेही यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

आदेश रद्द करण्याची मागणी

शासनाची नियतकालिके असलेल्या शेतकरी, किशोर, कृषी पणन मित्र, जीवन शिक्षण या नियतकालिकांनाही अशा नोटीसा आल्या आहेत, त्याबरोबरच वनराई, निरोप्या, कॉर्पोरेट सिटीझन, दिलीपराज वृत्त, हिंदुबोध, मधुमित्र, याज्ञवल्क्य परिवार, योेगेश्वर वार्ता, निर्मळ रानवारा, चाणक्य मंडल परिवार, सुगावा अशा नियतकालिकांना नोटीसा आल्या आहेत. सवलत नाकारल्याने आता व्यावसायिक दराने पोस्टींग करावे लागणार आहे. दिल्लीच्या टपाल खात्याने काढलेले आदेश त्वरित रद्द केले जावेत अशी जोरदार मागणी नियतकालिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

काय आहे सवलत

नियतकालिकांच्या अंकाच्या प्रती टपाल खात्याने निश्चित करून दिलेल्या दिनांकाला टपाल कार्यालयात नेऊन दिल्यास अंकाच्या वजनानुसार नियतकालिकांच्या वितरणासाठी सवलतीचा दर आकारला जातो. हा दर २५ पैशांना एक प्रत ते एक रुपयाला एक प्रत यादरम्यान असतो. आता नियतकालिकांच्या प्रकाशकांकडे अद्ययावत प्रमाणपत्र नसल्याने ही सवलत रद्द झाली असून अंक पाठविण्यासाठी किमान चौपट दर द्यावा लागणार आहे.

नियतकालिकांचे मालक, प्रकाशक, संपादक, पृष्ठसंख्या यामध्ये बदल झाला असेल तर वृत्तपत्र निबंधक कार्यालयाकडे त्याची नोंद करून अद्ययावत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासंदर्भातील कार्यवाही वृत्तपत्र निबंधक कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, नियतकालिकांच्या प्रमुखांकडे अद्ययावत प्रमाणपत्राची मागणी करण्याचे आदेश या कार्यालयाने टपाल खात्याला दिले आहेत. त्याचा वेगळा अर्थ काढून टपाल खात्याने अद्ययावत प्रमाणपत्र नसलेल्या नियतकालिकांच्या सलवतीच्या दरातील वितरणाचे परवाने रद्द केले आहेत. – मधुर बर्वे, संपादक, दिलीपराज वृत्त

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Obstacles in reaching diwali readers akp

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या