पुणे : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम जिल्ह्यात जोरात चालू असतानाच खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणचे काम तूर्त थांबविण्यात आले आहे. खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असून त्याला अचानक आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी गावांमधील जागा संपादित करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा एकत्रित उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मार्फत या रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यांत मिळून एकूण ५४ गावांचा यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार असून राजगुरूनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे. या प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, संरक्षण विभागाकडून खेड तालुक्यातील कामाला आक्षेप घेण्यात आल्याने सध्या काम थांबविण्यात आले आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘संरक्षण विभागाकडून प्रकल्पाच्या खेड येथील संरेखनाला आक्षेप घेण्यात आला आहे. खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना संरक्षण विभागाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आला नव्हता आणि आता अचानक आक्षेप घेण्यात आल्याने तूर्त तेथील काम थांबविण्यात आले आहे. पर्यायी गावांमधील जमीन घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रेल्वेचे अधिकारी अजय जैस्वाल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. याबाबत लवकरच तोडगा काढला जाणार आहे.’
दरम्यान, पुणे जिल्ह्यातून या प्रकल्पासाठी आतापर्यंत २६ खरेदीखत करण्यात आली आहेत. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक खरेदीखत पुणे जिल्ह्यातच झाली आहेत. जिल्ह्यातील ५४ पैकी ४० गावांची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाची वैशिष्टय़े
रेल्वेचा वेग प्रतितास २०० कि.मी.
१८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग
विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम
६० टक्के वित्तीय संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे प्रत्येकी २० टक्के खर्चाचा वाटा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obstruction pune nashik railway project in khed taluka department defense objection amy
First published on: 24-05-2022 at 01:06 IST