एलबीटीच्या विरोधात आंदोलन करून लष्कर भागातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या २५ व्यापाऱ्यांच्या विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुणे मेटल फेडरेशन आणि पुणे व्यापारी संघाच्या सदस्यांचा समावेश आहे.
पोलीस कर्मचारी नंदकुमार शिंदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून मोहनलाल कोठारी, विनय अशोक जैन, रमेश मोहनलाल जैन, महेश सुराणा, जयंतीलाल लालचंद जैन, विनोद जयंतीलाल मेहता, राकेश लालवाणी, पारस जैन यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एलबीटीच्या विरोधात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बाटा चौकात काळे झेंडे घेऊन व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. लष्कर परिसरातील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून केले जात होते. त्यामध्ये लष्कर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे आंदोलन थांबविले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बेकायदेशीरपणे जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लष्कर पोलीस अधिक तपास करत आहेत.