शीतगृहातील परदेशी सफरचंद अपायकारक

शीतगृहातील परदेशी सफरचंद आकर्षक आणि चकचकीत दिसत असली तरी सध्या शीतगृहातून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असलेल्या परदेशी सफरचंदांचा हंगाम संपला आहे. उपलब्ध असलेली परदेशी सफरचंदांची साठवण मुदत संपलेली आहे. परदेशी सफरचंदांपेक्षा देशी सफरचंदांचे पोषणमूल्य चांगले असून ती गोडीला चांगलीही आहेत. मात्र सामान्य ग्राहकांचा ओढा चकचकीत परदेशी सफरचंदांकडे आहे. परदेशी सफरचंदापेक्षा देशी सिमला सफरचंद थोडी महाग असली तरी देशी सफरचंद खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.

देशी सिमला सफरचंदांची बाजारात आवक सुरू झाली आहे. त्याला सिमला सफरचंद असे म्हटले जाते. हिमाचल प्रदेशातून सध्या गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात सिमला सफरचंदांची चांगली आवक होत आहे. मार्केटयार्डातील फळबाजारात सध्या दररोज सात ते आठ हजार पेटय़ा एवढी आवक सुरू आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील सिमला सफरचंदाचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

ते म्हणाले,की सिमला सफरचंदांची प्रतवारी चांगली असून ती चवीला गोड आहेत. सध्या बाजारात वॉशिंग्टन, रेड डिलेशिअस, आरडी, रॉयल गाला, फुजी अशा प्रकारातील परदेशी सफरचंद विक्रीस उपलब्ध आहेत. परदेशी सफरचंदांचा प्रतिकिलोचा भाव देशी सफरचंदापेक्षा कमी आहे. परदेशी सफरचंद दिसायला चकचकीत आहेत. त्यामुळे साहजिकच ग्राहक चकचकीत आणि सिमला सफरचंदांपेक्षा स्वस्त अशा परदेशी सफरचंदांच्या खरेदीला पसंती देतो. परदेशी सफरचंद बाजारात येऊन बराच कालावधी उलटला आहे. बाहेरून आकर्षक असली तरी मोठा कालावधी झाल्याने ती आतून किडलेली आहेत. त्यामुळे अशी सफरचंद खाणे अपायकारक ठरू शकते. मुंबईतील शीतगृहात साठविण्यात आलेली सफरचंद बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. या सफरचंदांचा हंगाम संपला आहे. शीतगृहात साठविण्यात आलेली या सफरचंदाची मुदत संपली आहे. त्यामुळे ती स्वस्त दरात विकण्यात येतात.

सिमला सफरचंदांचे दर

घाऊक बाजारातील पेटी (२४ ते २५ किलो)- १८०० ते २२०० रूपये, १५०० ते १८०० रूपये

किरकोळ बाजारातील दर (एक किलो, प्रतवारीनुसार)-८० ते १०० रूपये

परदेशी सफरचंदांचा दर (एक किलो, प्रतवारीनुसार) ६० ते ८० रूपये

एडिबल वॅक्सिंग

परदेशी सफरचंद चकचकीत आहेत. ती चकचकीत दिसण्यासाठी एडिबल वॅक्सिंग (सेवन करण्यास योग्य असे मेणाचे आवरण) वापरण्यात येते. अशा प्रकारच्या एडिबल व्ॉक्िंसगची मुदत तीन महिने असते. सध्या बाजारात विकण्यात येत असलेल्या परदेशी सफरचंदांवर वापरण्यात येणाऱ्या एडिबल वॅक्सिंगची मुदतदेखील संपली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

ताजी फळे तसेच ताजे अन्नपदार्थ खाणे केव्हाही चांगले. शीतगृह किंवा शीतपेटीमध्ये ठेवलेल्या पदार्थाचे पोषणमूल्य कमी होते. त्याच्यावर एक प्रकारची प्रक्रिया होते. त्यामुळे ताजी फळे खाणे केव्हाही चांगले. अगदी स्वयंपाक केल्यानंतर लगेचच जेवण करणे हितकारक असते. एखादा अन्नपदार्थ वारंवार गरम केल्यास त्यातील पोषणमूल्य कमी होते.

– डॉ. अनुराधा चिडगुपकर