भाडे नाकारण्यासाठी विविध क्लृप्त्यांचा वापर; ऐन प्रवासादरम्यान प्रवाशांची अडवणूक

प्रचलित सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांना पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॅब’ सुविधेची संकल्पना ही ग्राहकाभिमुख असली, तरी प्रत्यक्षात आता चालकांनी या संकल्पनेला बगल दिली आहे. ट्रिप रद्द केल्यावर कॅब चालकांना माफक का होईना दंड केला जात असला, तरी आता तांत्रिक क्लृप्त्या शोधून चालकांनी कंपन्यांनी तयार केलेल्या प्रणालींनाच बगल दिली आहे. इतकेच नाही तर ऐन प्रवासादरम्यान प्रवाशांची अडवणूक करून, त्यांनाच ट्रिप रद्द करण्यास लावून दंडाचा भुर्दंडही प्रवाशांच्याच माथी मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर रिक्षा असतानाही ओला, उबेर कंपन्यांच्या शहरांतर्गत कॅब सुविधेने मागील दोन वर्षांत शहरात चांगलाच जम बसविला. मोबाइल अ‍ॅपवर शहरात कोणत्याही ठिकाणी काही वेळातच प्रवासाची सुविधा, एकदा कॅबसाठी नोंद केल्यावर हमखास मिळणारी सेवा, चालकांबाबत तक्रार करण्याची आणि त्या तक्रारीची दखल घेण्यात येत असल्याचे समाधान अशा काही जमेच्या बाजू या कंपन्यांनी दिल्या. त्यामुळे प्रवाशांनीही ही सेवा अल्प काळातच स्वीकारली. गर्दीच्या वेळी किंवा मागणी जास्त असेल तर जास्त दर आणि मागणी कमी असेल तर कमी दर हे गणितही नागरिकांनी स्वीकारले. मात्र आता अ‍ॅपवरून कॅबची नोंदणी झाल्यावर ट्रिप रद्द करताच येणार नाही हा गैरसमज ठरवून कॅब चालकांकडून तांत्रिक क्लृप्त्या अवलंबल्या जातात. कंपन्यांनी कॅबचे नियंत्रण करण्यासाठी तयार केलेले नियम आणि प्रणाली आता कॅब चालकांनीच कुचकामी ठरवली आहे.

कॅब नाकारण्यासाठी तांत्रिक क्लृप्त्या

एकदा कॅबसाठी नोंदणी केल्यावर ठरावीक वेळानंतर कॅबचालक किंवा प्रवासी जो कुणी ट्रिप रद्द करेल त्याला ट्रिपच्या एकूण खर्चाच्या तुलनेत काही प्रमाणात दंड भरावा लागतो. किमान ५० रुपये ते साधारण ७० रुपयांपर्यंतचा दंड शहरांतर्गत वाहतुकीसाठी बसतो. मात्र चालकांनी आता ट्रिप रद्द करून हा दंड टाळण्याचे पर्यायही शोधून काढले आहेत. ट्रिपबाबत चालकाला माहिती मिळाली की त्याच्याकडून प्रवाशाला फोन केला जातो. कुठे जायचे आहे ते ठिकाण विचारून घेण्यात येते. त्या ठिकाणी जाण्याची इच्छा चालकाला नसेल, तर ट्रिप रद्द करण्यात येते. प्रवासी जेथे थांबला आहे, तो पत्ताच मिळाला नाही असे सांगून चालक ट्रिप रद्द करतात. प्रवाशाशी संपर्क होऊ शकला नाही असाही पर्याय निवडून ट्रिप रद्द करण्याबरोबरच दंडही टाळतात. काही वेळा नको असलेल्या ठिकाणाची ट्रिप मिळाल्यास चालकाकडून फोन बंद केला जातो. जीपीएस प्रणालीवर पाच मिनिटांच्या अंतरावर दिसणारे वाहन प्रत्यक्षात अर्धा तास झाला तरीही प्रवाशाला न्यायला येत नाही. त्यामुळे नाइलाजाने ट्रिप रद्द करण्याची वेळ प्रवाशावरच येते आणि त्याला दंड भरावा लागतो. अशाच प्रकारे काही वेळा ज्या ठिकाणहून निघायचे तेथे कॅब पोहोचल्याची नोंद चालक करतात. कॅब प्रवाशाला न्यायच्या ठिकाणी आल्यानंतर जर पुढील पंधरा मिनिटांमध्ये प्रवाशाबरोबर संपर्क झाला नाही, तर ट्रिप रद्द करता येते, अशावेळीही अनेकदा प्रवाशांना दंड भरावा लागतो. प्रत्यक्षात प्रवाशांना न्यायला कॅब आलेलीच नसते. आधीची ट्रिप असल्यामुळे ती रद्दही करता येत नाही. उबेरसाठी सांकेतांक द्यावा लागत नाही. त्यामुळे प्रवाशाला घेण्यापूर्वीच ईप्सित स्थळाच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याची नोंद करतात आणि अगदी काही अंतरावर गेल्यावर तो पूर्ण झाल्याचीही नोंद केली जाते. त्यामुळे किमान भाडे प्रवाशाला भरावे लागते.

पैसे मिळतात मात्र मनस्ताप कायम..

चालकांच्या मनमानीमुळे अनेकदा प्रवाशांना भुर्दंड बसतो. विशेषत: मोबाइल वॉलेट, डेबिट कार्ड वापरून भाडे देणाऱ्या प्रवाशांची रक्कम कापून घेतली जाते. त्यानंतर कंपनीकडे तक्रार केल्यानंतर अपवाद वगळता ती जमाही होते. मात्र प्रवाशांच्या वेळेचे नियोजन बिघडणे, असुविधा आणि त्यामुळे मनस्तापाला सामोरे जावेच लागते. विशिष्ट भागातील चालक एकत्रितपणे ठरवून कॅब काही काळ बंद ठेवतात. कमी कॅब असल्यामुळे त्या भागातील प्रवासाचे दरही वाढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

चालकांची अरेरावी.. 

कंपन्यांकडून चालकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि योजना आखल्या जातात. त्यामध्ये ठरावीक वेळात, ठरावीक अंतर किंवा ट्रिप करणे, ठरावीक रक्कम मिळेल एवढय़ा ट्रिप करणे अशी आव्हाने दिली जातात. या योजनेतील चालकांना बक्षीस म्हणून वाढीव रक्कम दिली जाते. मात्र या काळात ट्रिप रद्द करता येत नाही. अशावेळी प्रवाशानेच ट्रिप रद्द करावी म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्याचे प्रकारही घडले आहेत. प्रवाशाला त्याच्या ठिकणाहून घ्यायचे, प्रवास सुरू करायचा आणि थोडे अंतर गेल्यावर ट्रिप रद्द करण्यासाठी दबाव टाकला जातो. चालक गाडी पुढे न नेताच थांबून राहतात आणि ट्रिप रद्द करण्याची वेळ प्रवाशांवर येते. अशा वेळी अगदी काही मीटर अंतरासाठी ५० ते ६० रुपये किमान भाडे याचा भुर्दंड प्रवाशाला सहन करावा लागतो.