पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भरधाव मोटार दुभाजकाला धडकून रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर मोटार चालक जखमी झाला. ही घटना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मावळ तालुक्यातील वाकसई येथे घडली.

हुसेन गोधरावाला( वय २७, रा. कोंढवा, पुणे) आसीर इनामदार (वय-२६, रा. नेहरूनगर, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. वाहन चालक अनिकेत गौतम बरवा (रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तोही अपघातात जखमी झाला आहे. पोलीस शिपाई गोकुळ खेडकर यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत आणि त्याचे दोन मित्र मोटारी मधून जुन्या पुणे – मुंबई महामार्गाने जात होते. मावळ तालुक्यातील वाकसई येथे आल्यानंतर त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला जोरदार धडकली. त्यानंतर मोटार रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली. या अपघातात हुसैन शेख, आसीर इनामदार यांचा मृत्यू झाला तर, अनिकेत हा गंभीर जखमी झाला. लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.