Omicron : चिंता वाढली! पिंपरी-चिंचवडमध्ये सहा, पुण्यात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला!

राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे

omicron variant corona

राज्याच्या दृष्टीने चिंता वाढणारी बातमी समोर आली आहे. कारण, आज राज्यात सात नवीन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे.

आज आढळलेल्या सात रुग्णांमध्ये पिंपरमध्ये सहा, पुण्यातील एक रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे.

२४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुला आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणून सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. तसेच, पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला देखील या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे.

या सहा जणांपैकी तीन जण नायजेरियाहून आले आहेत, तर इतर तिघे त्यांचे निकटसहावासित आहेत. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड येथे आली. त्या तिघींनी ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.

या तिघींच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून, त्याततील या महिलेचा ४५ वर्षांचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्ष आणि सात वर्षांच्या दोन मुली या कोविडबाधित आल्या आहेत. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर पाच जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रूग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रूग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रूग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून, हा रूग्ण १८ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविडबाधित आढळला. त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.

आरोग्य विभागाचे जनतेला आवाहन –

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्या बाबात स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

ते सहा जण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात –

“पिंपरी-चिंचवड शहरातील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. ४४ वर्षीय महिला ही नायजेरियातून दोन्ही मुलींसह पिंपरीत तिच्या भावाकडे आली होती. तेव्हा, तिच्यासह भाऊ आणि त्यांच्या दोन मुली अशा एकूण सहा जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. या सहा जणांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात विलीगकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील ४४ वर्षीय महिलेला ताप आलेला होता, इतर मुलांना आणि महिलेचा भावाला जास्त लक्षण नाहीत ते सर्व सुखरूप आहेत.” अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Omicron six patients found in pimpri chinchwad and one in pune msr