जम्मू काश्मीरबाबतचे कलम ३७० हटविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी संसदेत पाठिंबा दिला. परंतू, महाराष्ट्रात आल्यावर ते याला विरोध करतात, या दुटप्पी भूमिकेबाबत येणार्‍या निवडणुकीत शरद पवारांना जाब विचारायला हवा, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, राज्यसभा खासदार संजय काकडे उपस्थित होते.

पात्रा म्हणाले, जम्मू आणि काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवल्यानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं, ही बाब योग्य नाही. कारण कलम हटवल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. मागील ७० वर्षात काश्मीरमध्ये केवळ तीन कुटुंबांचीच सत्ता होती. त्यामुळे तिथे भ्रष्टाचाराला वाव मिळाला. ‘लेटस बीट इंडिया’ या मोहिमेतून या तीन कुटुंबियांनी फुटिरतावादाला चालना देऊन काश्मीर मिळविण्याचा डाव रचला. यामध्ये ४२ हजार स्थानिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच २०१८/१९ मध्ये काश्मीरव्यतिरिक्त इतर राज्यातील लोकांवर प्रत्येकी आठ हजार रुपये सरकारकडून खर्च करण्यात आला. तर, काश्मीरमधील लोकांवर सर्वाधिक प्रत्येकी २८ हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र, तरी देखील गरिबी तशीच राहीली.

पात्रा पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीर मधील कलम ३७० हटवावे अशी देशातील सर्व जनतेची मागील ७० वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र, आत्तापर्यंतच्या सरकारांमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्याने ते होऊ शकले नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.