पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष कराड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजय जेधे हे मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाले होते. कात्रज भागातील बीआरटी मार्ग परिसरात भरधाव दुचाकी घसरली. अपघातात दुचाकीस्वार जेधे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या घटनेची नोंद भारती विद्यापीठ पोलिसांनी केली असून, हवालदार भोसले तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश सुधाकर कर्णे (वय ३९, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याबाबत दीपक प्रकाश निकम (वय ३९, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, फुरसुंगी, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दीपक निकम आणि त्यांचे मित्र सुरेश कर्णे हे गुरुवारी (३ जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरुन दुचाकीवरुन निघाले होते. वडकी नाला परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी कर्णे हे गंभीर जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कर्णे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.