येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरी रेल्वेतील आसनांवर ; रेल्वेचा निर्णय

येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरींचा वापर आता रेल्वे गाड्यांमध्ये करण्यात येणार आहे.

येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरी रेल्वेतील आसनांवर ; रेल्वेचा निर्णय
येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरी रेल्वेतील आसनांवर

येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरींचा वापर आता रेल्वे गाड्यांमध्ये करण्यात येणार आहे. वातानुकूलित डब्यांमध्ये या चादरी प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला आहे.

स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण रेल्वेने अवलंबले आहे. याच धोरणानुसार कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीलाही प्रोत्साहन देण्याचा रेल्वेचा उद्देश आहे. येरवडा कारागृहामध्ये कैद्यांकडून विविध वस्तू तयार केल्या जातात. कारागृहामध्ये त्यासाठी स्वतंत्र कार्यशाळाही आहे. वस्तू तयार करण्याबाबत कैद्यांना प्रशिक्षणही दिले जाते. या कामासाठी त्यांना मानधनही दिले जाते. कैद्यांनी साकारलेल्या वस्तूंच्या विक्रीला आता रेल्वेकडूनही हातभार लावण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्टला मध्य रेल्वेकडून चालविण्यात येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससाठी कैद्यांनी तयार केलेल्या ८९ चादरी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याचा वापरही सुरू करण्यात येत आहे. प्रवाशांकडून त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता इतर गाड्यांमध्येही या चादरींचा वापर सुरू करण्यात येणार आहे. पुणे-अहमदाबाद दुरंतो एक्स्प्रेसमध्येही या चादरींचा वापर करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य यांत्रिकी अभियंता ए. के. गुप्ता, पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनामध्ये पुणे रेल्वे प्रशासन आणि येरवडा कारागृहाच्या प्रशासनाकडून या योजनेचे धोरण आखण्यात आले आहे. पुणे रेल्वेकडून वरिष्ठ अभियंता विजयसिंह दडस यांच्याकडून चादरींच्या पुरवठ्याबाबत कारागृह प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संघाची बदनामी करण्याच्या हेतूने समाजमाध्यमातून मजकूर प्रसारित ; सखोल तपासाची रा. स्व. संघाची मागणी
फोटो गॅलरी