scorecardresearch

पुण्यात पथदिव्यांच्या खांबांना दोन कोटींची ‘झळाळी’; जी-२० परिषदेच्या निमित्ताने पथदिव्यांची रंगरंगोटी

विमानतळ ते सेनापती बापट या मार्गावर नव्याने फायबरचे पथदिव्यांचे खांब बसविण्याचा विचार केला जात आहे. या एका खांबाची किंमत २३ हजार रुपये इतकी आहे.

पुण्यात पथदिव्यांच्या खांबांना दोन कोटींची ‘झळाळी’; जी-२० परिषदेच्या निमित्ताने पथदिव्यांची रंगरंगोटी
संग्रहित छायाचित्र

जी-२० परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने सुशोभीकरणाला प्राधान्य दिले असून शहरातील सहा हजार पथदिव्यांच्या खांबांची एकसमान रंगरंगोटी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एका खांबासाठी दोन हजार रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. दरम्यान, एक हजार नवीन फायबरचे पथदिवे बसविण्याचे प्रस्तावित असून एका खांबासाठी २३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

हेही वाचा- ‘घाशीराम कोतवाल’चा मूळ संचातील दुर्मीळ प्रयोग आजपासून यूटय़ूबवर 

पुणे शहरात जानेवारी महिन्यात जी-२० परिषदेनिमित्त काही बैठका होणार आहे. या परिषदेला राष्ट्रीय-आंतराराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने शहराचा मेकओव्हर करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे. त्यानुसार पुण्यातील ६० चौक आणि वाहतूक बेटांचे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीनुसार सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. विविध देशांचे प्रतिनिधी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील तारांकित हॉटेल आणि इतर काही भागांतून प्रवास करणार आहेत. या मार्गावरील पथदिवे एकसारखे असावेत, ते नादुरुस्त किंवा बंद असू नयेत, यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

हेही वाचा- पिंपरी: फ्लॅट देण्याच्या बहाण्याने तीन कोटींची फसवणूक करणारा भामटा गुंडाला अटक

विमानतळ ते सेनापती बापट या मार्गावर नव्याने फायबरचे पथदिव्यांचे खांब बसविण्याचा विचार केला जात आहे. या एका खांबाची किंमत २३ हजार रुपये इतकी आहे. त्यासाठी सुमारे दोन कोटी ३० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली. विविध देशांचे प्रतिनिधी ज्या भागांना भेट देणार आहेत, अशा भागातील सुमारे सहा हजार पथदिवे रंगविले जाणार आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले पथदिव्यांचे खांब रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी बसविले जाणार आहेत. तसेच पथदिव्यांना वीजपुरवठा करण्यासाठी काही भागात नव्याने सुमारे १८ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकल्या जाणार आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 10:53 IST

संबंधित बातम्या