फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा पर्यावरण गट, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग आणि पर्यावरण शास्त्र विभाग यांच्यातर्फे सायकल आणि इलेक्ट्रिक वाहनांची रॅली शनिवारी काढण्यात आली. कार्बन न्युट्रल परिसराविषयी जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच कार्बन न्यूट्रल परिसराची शपथही विद्यार्थ्यांनी घेतली. 

तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले.  प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे श्रीनिवास चव्हाण, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, उपप्राचार्य प्रा. नारायण कुलकर्णी, डॉ. संतोष फरांदे, डॉ. सोनालिका पवार, डॉ. समीर तेरदाळकर, प्रा. शिवाजी कोकाटे, प्रा. प्रीती आफळे आदी या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा : पुणे : … अन् महापालिकेने अखेर पाषाण तलाव परिसरात प्रेमी युगुलांना बंदीचा फलक हटवला

डॉ. शेंडे म्हणाले, की मानव निसर्गावर लोभरूपी अणुबॉम्ब टाकत आहे. त्यामुळे निसर्गाचे नुकसान होणार नाही, पण दुष्काळ, महापूर, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीतून आपले नुकसान होणार आहे. आठ दिवसांपूर्वी चीनमध्ये राष्ट्रीय दुष्काळ जाहीर करण्यात आला. फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेनमध्येही दुष्काळी स्थितीमुळे अन्न आणि पाण्याचा तुटवडा आहे. युक्रेनमधील युद्धामुळे सात दशलक्ष (मिलियन) नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, तर नैसर्गिक आपत्तींमुळे आठ अब्ज (बिलियन) नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ येऊ शकते. जलद विकास, ई वाहने, मोबाईलद्वारे वाहन उपलब्धता म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे, तर शाश्वत विकासाच्या मूल्यमापनाची जबाबदारी आणि पुनर्वापर आदींना स्मार्ट सिटी संकल्पनेत महत्त्व आहे. कार्बन न्यूट्रलिटी हा अविभाज्य भाग आहे.

हेही वाचा : पुणे : जिल्हा परिषदेत नोकरीच्या आमिषाने १८ लाखांची फसवणूक ; एकास अटक

त्या दृष्टीने ‘कार्बन न्यूट्रल परिसर’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. उद्याच्या पिढीचा विचार करून आज निसर्ग संरक्षणाचे काम करणे आवश्यक आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर पुनर्वापर न होणार्‍या प्लास्टिकपासून मुक्त झाला आहे. महाविद्यालयाच्या 66 एकर जागेवर आगामी काही महिन्यांत कार्बन न्यूट्रल परिसराचे लक्ष्य पूर्ण करणार आहे, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.