पिंपरी-चिंचवडमध्ये व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १ कोटी १० लाखांची उलटी जप्त करण्यात आली आहे. या उलटीचा उपयोग परफ्युम आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी करतात असं पोलिसांनी सांगितले असून याची बाजारात मोठी मागणी आहे. 

या प्रकरणी जॉन सुनील साठे आणि अमित हुकूमचंद बागमार यांना अटक करण्यात आली आहे. जॉन हा व्हेल माशाची उलटी घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये आला होता. त्याला ग्राहक मिळत नसल्याने गुन्हे शाखा एकने डमी ग्राहक पाठवत सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १ कोटी १० लाख रुपयांची ५५० ग्रॅम उलटी ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच, एक अँटिक बाटली ताब्यात घेण्यात आली असून यावर ब्लेड ठेवल्यास क्षणार्धात जळून खाक होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितलं आहे. आरोपी अमित हुकूमचंद बागमार हा मुख्य आरोपी असून त्याच्याकडून जॉनने ही उलटी मागवली होती. तो पिंपरी-चिंचवड शहरात ग्राहक शोधत होता. याची कुणकुण गुन्हे शाखा युनिट एकच्या कर्मचाऱ्यांना लागली. त्यांनी, डमी ग्राहक पाठवून जॉनला सापळा रचत अटक केली आहे. त्यानंतर, चौकशी केली असता नाशिक येथून अमित यांच्याकडून उलटी आणल्याच समोर आला त्याला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप ही उलटी अमितकडे कोठून आली हा प्रश्न असून याचा तपास पोलीस करत आहेत. 

व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग हा परफ्युम इंडस्ट्रीजमध्ये जास्त होतो. उलटीचा काही अंश परफ्युममध्ये वापरल्यास त्याचा सुगंध जास्त वेळ दरवळतो. तर, पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील त्या उलटीचा उपयोग केला जातो असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं आहे.