शाळा सुटल्यानंतर पायी घरी निघालेल्या दोन विद्यार्थिनींना भरधाव टँकरने उडविले. या अपघातामध्ये एका पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर जखमी आहे. कोंढव्यातील उंड्री-महंमदवाडी रस्त्यावर सोमवारी दुपारी हा अपघात झाला. कोंढवा पोलिसांनी टँकर चालकास अटक केली आहे.
अलिशा शहीद खान (वय १५, रा. हांडेवाडी पंढरीनगर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर वैष्णवी संजय कदम (वय १५) ही गंभीर जखमी आहे. या दोघीही उंड्री येथील हिल ग्रीन इंग्लिश माध्यमाच्या शाळेत नववीत शिकत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिशा, तिचा भाऊ शाहबाज आणि वैष्णवी हे दुपारी उंड्रीच्या दिशेने जात होते. त्या वेळी महंमदवाडीच्या दिशेकडून आलेल्या भरधाव टँकरने त्यांना उडविले. शाहबाज हा पळाल्यामुळे तो थोडक्यात बचावला. यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या असता त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अलिशाचा मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालक सोमनाथ रामभाऊ िभताडे याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मांढरे हे करत आहेत. याबाबत जखमी वैष्णवीचे वडील संजय कमद म्हणाले, की घडलेली घटना धक्कादायक आहे. चालकावर सक्त कारवाई लागेल.
वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी झालेल्या अपघाताच्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-बेंगलोर बाह्य़वळण महामार्गावर सिंहगड कॉलेजसमोर अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये कुणाल अशोक माने (वय २२, रा. जनात वसाहत) याचा मृत्यू झाला आहे. तर नितीन रघुनाथ शेडगे हा जखमी आहे. पिंपळे सौदागर येथे ज्ञानेश्वर सुधाकर जाधव (वय २२, रा. नंदू काटे चाळ, रहाटणी) हा दुचाकीवरून घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. तिसरी घटना वानवडी गाव येथील शिवरकर रस्त्यावरील सांस्कृतिक भवन समोर घडली. दुचाकीस्वार विशाल कांबळे  (वय ३५, रा. कोंढवा) याने पाठीमागे मित्राला बसवून भरधाव दुचाकी चालवून अंकुश अशोक पवार (वय २२, रा. हडपसर) याला जोराची धडक दिली. त्यामध्ये पवार याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.