डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांची हत्या झालेल्या पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दाभोलकर यांची कन्या मुक्ता याही यावेळी उपस्थित होत्या. ‘डॉ. दाभोलकर अमर रहे..’, ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सगळे दाभोलकर..’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्षे पूर्ण होत असतानाच गेल्या सोमवारी कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. पानसरे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यानिमित्ताने पानसरे यांच्यावरील हल्ल्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.
खबरदार, विचार कराल तर..
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून, त्यांनाही खुनी पकडण्यात अपयश आले आहे. या घटनेला दीड वर्षे झाल्यामुळे खून करणाऱयाला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी यावेळी केली. दाभोलकर यांच्या हत्येशी साधर्म्य असलेली दुसरी घटना सहजपणे डोळ्यात भरते आहे. त्यामुळे यातून लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
भाजप सरकार त्यांची नैतिक जबाबदारी काय मानतात? – मुक्ता दाभोलकरांचा प्रश्न