लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात आर्थिक वादातून एका उद्योजकाने शेतकऱ्यावर गोळीबार केला. गोळीबारात एकजण जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्तुळाकार मार्गालगत असलेल्या जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे.

काळुराम महादेव गोते (वय ३५, रा. भिवरी, हवेली ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ल्ल्यात जखमी झाले. याप्रकरणी दशरथ विठ्ठल शितोळे (वय ५२, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. शितोळे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. त्याने शेतकऱ्यांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून वर्तुळाकार मार्गालगत असलेल्या जमिनीत मोठी गुंतवणूक केली आहे.

आणखी वाचा-शिक्षकांची नियुक्तीनंतर परीक्षा? शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण…

गोते यांनी शितोळे यांच्याकडे काही रक्कम गुंतवली होती. मात्र, तो परतावा देत नव्हता. त्यामुळे यापूर्वीही त्यांच्यात खटके उडाले होते. गोते एका सहकाऱ्यासमवेत शनिवारी दुपारी एकच्या सुमारास शितोळे याच्याशी चर्चा करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. आर्थिक वादातून दोघांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी त्याने गोते यांच्या दिशेने शितोळेने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांचा हात आणि पायाला चाटून गेल्या. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच ऊरळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी शितोळे याला ताब्यात घेतले. त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली. शितोळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.