पुण्यातून महाराष्ट्रात पाऊल ठेवणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुण्यात आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर नागपूरमध्ये आणखी दोन जणांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याविषयीची माहिती दिली.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्यस्थितीची माहिती दिली. डॉ. म्हैसकर म्हणाले,’जास्तीच्या दरानं मास्क आणि सॅनिटायझर विक्री करणाऱ्या चार मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. चारही मेडिकलला सील करण्यात आलं. त्यात एकानं समाधानकारक माहिती दिल्यानं त्याला यातून वगळण्यात आलं. 235 आतंररूग्ण होते, त्यातील 211 जणांना सुटी देण्यात आली आहे. 233 नमुने पाठवण्यात आले होते. आधी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात आणखी एक वाढला आहे. ही व्यक्ती अमेरिकेतून आली आहे. यात जे परदेशातून आले त्यांचा पाठपुरावा करण्यात आला,’ असं म्हैसेकर म्हणाले.

‘311 जण विलगीकरणासाठी आहेत. विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या काही नागरिकांनी तक्रारी केल्याचं माझ्यापर्यंत आलं आहे. त्यांना बघायला डॉक्टर येत नाही, असं काहीचं म्हणणं आहे. पण, याची मी चौकशी केली.  या माहितीत तथ्य नाही. पंरतु अशी चुकीची माहिती दिली जात असेल, तर प्रशासनाशी चौकशी करावी. पूर्ण माहिती दिली जाईल. माध्यमांनी याची खबरदारी घ्यावी. या रुग्णांना अर्ध्या अर्ध्या तासाला तपासण्याची गरज नाही. त्यामुळे रुग्णांकडून देण्यात आलेली माहिती खरी नाही. ज्या जिल्ह्यात परदेशातून आलेले नागरिक आहेत. त्यांना विलग राहण्याचं सांगण्यात आलं आहे. होईल तितका घरच्या लोकांशी संपर्क टाळण्याचं सांगण्यात आलं आहे,’ अशी माहिती म्हैसेकर यांनी दिली.

सोशल मीडिया रडारवर-

‘साताऱ्यामध्ये एक पॉझिटिव्ह आढळून आल्याचं सोशल मीडियावर पसरवण्यात आलं. एका वृत्तवाहिनीचं चिन्ह घेऊन हे करण्यात आलं आहे. ज्यानं हे पसरवलं आहे, त्याचा शोध घेणं सुरू आहे. मात्र, दोन दिवसांपासून त्याचा मोबाईल बंद येत आहे. पण, अशा प्रकारच्या बातम्या पसरवणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही,’ असा इशारा डॉ. म्हैसकर यांनी दिला.

17 जण करोनाबाधित

सध्या राज्यात 17 करोनाबाधित आहेत. पुण्यात संसर्ग झालेल्या दहा जणांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत 3 जण आढळून आले आहेत. ठाण्यात एकाला करोनाचा संसर्ग झाला आहे. तर नागपूरमध्ये अमेरिकेहून परतलेल्या एकाला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांच्या पत्नीलाही आता करोनाची लागण झाली आहेत. तर आणखी एक जण करोनाबाधित आढळून आला आहे.