पुणे : एकतर्फी प्रेमातून पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणीवर एकाने कोयत्याने वार केले. मानेवर तीन आणि पोटावर चार असे सात वार तिच्यावर करण्यात आले असून, मज्जारज्जूला गंभीर इजा झाली आहे. तिच्यावर सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.

या प्रकरणी पालघर पोलिसांनी तरुणाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणीच्या चुलत्याने फिर्याद दिली आहे. तरुणीच्या हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना १२ जून रोजी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पालघर येथील गोल्ड टॉकीजच्या जवळील रस्त्यावर घडली आहे.

नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मुळची माण (जि. सातारा) तालुक्यात राहणारी आहे. तर आरोपी हा बीड जिल्ह्यातील. दोघेजण स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना एकाच क्लासमध्ये होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये तरुणीची पालघर येथे महसुल सहायक म्हणून निवड झाली. तर तरुण उच्च न्यायालय येथे लिपीक म्हणून नोकरीला लागला. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे  तिने एक महिन्यापासून त्याच्याशी बोलणे बंद केले होते. ११ जून रोजी तरुणी घराकडे पायी चालत निघाली होती. त्यावेळी रस्त्यात अडवून तरुण तिला त्रास देऊ लागला होता. त्यावेळी ‘तू जर मला परत भेटला तर मी पोलिसात तक्रार करेन,’ असे तरुणीने त्याला सांगितले. दुसऱ्या दिवशी काम संपल्यानंतर रस्त्याने पायी चालत निघाली असताना तरुणाने तिला पाठलाग करून गाठले. काही कळण्याच्या आत त्याने तिच्यावर कोत्याने हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने ती रस्त्यात कोसळली. त्यानंतर तरुण तेथून पळून गेला. स्थानिकांनी तिला सुरूवातीला सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पालघर येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, मज्जारज्जूला गंभीर इजा झाल्याने तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसापूर्वी तिच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. परंतु, अद्याप ती शुद्धीवर नसून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला केल्याची माहिती तिच्या एका मैत्रीणीने चुलत्यांना दिली. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

तरुणीवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर सिल्वासा येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात यांनी सांगितले.