पुणे : एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीच्या पतीचा खून करुन पसार झालेल्या तरुणाला अटक केली. याप्रकरणात एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. जेजुरी पोलीस, तसेच ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सुशांत संदीप मापारे (वय २१, रा. माळशिरस, ता. पुरंदर, मूळ रा. पिंपळगाव, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातील शेतशिवारात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. तीक्ष्ण शस्त्राने वार करुन जगताप याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तरुणाच्या मामाने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नव्हते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार माापरे याने तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. तो यवत परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी त्याला पकडले.
ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, महेश पाटील, नामदेव तारडे, सर्जेराव पुजारी, अण्णासाहेब देशमुख, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे यांनी ही कामगिरी केली.
आरोपी मापारे याचे खून झालेल्या तरुणाच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते. तिच्यासोबत त्याला विवाह करायचा होता. मात्र, तरुणीचा खून झालेल्या तरुणाशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. तेव्हापासून तो तिच्या पतीवर चिडला होता. त्याने तरुणीच्या पतीचा खून करण्याचा कट रचला. पतीला दारू पिण्याच्या बहाण्याने माळशिरस परिसरातील शेतात बोलावून घेतले. त्यानंतर अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने त्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आर्थिक वादातून वहिनीचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
आर्थिक वादातून वहिनीचा खून करणाऱ्या दिराला पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीला न्यायालयाने १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावे लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.
धुळा बाबा गोरड (वय ४१, रा. साकुर्डे, ता. पुरंदर, मूळ रा. पुनवर, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. सुमनबाई नारायण गोरड (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुमनबाई यांचा मुलगा आनंद (वय २२) याने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सुमनबाई यांच्या पतीचे १९९९ मध्ये निधन झाले. त्यांचा मुलगा आनंद स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. सुमनबाई करमाळ्यातील पुनवर गावात शेती करायच्या. त्यांचा चुलत दिर धुळा हा पुरंदर तालुक्यातील साकुर्डे गावात मजुरी करत होता.
आनंद हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथे गेला होता. १३ सप्टेंबर २०१७ रोजी सुमनबाई मुलगा आनंद याला भेटण्यासाठी श्रीगोंदा येथे गेल्या होत्या. त्यांनी आनंदला दोन हजार रुपये खर्चासाठी दिले. तेथून त्या गावी परतल्या नाही. सुमनबाई चुलत दिर धुळा गोरड याच्याकडे गेल्या. आर्थिक वादातून धुळा याने त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्याचा खून करुन मृतदेह शेतात पुरला. खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर धुळा याला अटक करण्यत आली.
सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. वाकोडे, सहायक निरीक्षक आर. व्ही. माळेगावे यांनी तपास केला. सरकार पक्षाकडून सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच ग्राह्य धरून आरोपी धुळा याला न्यायलायने जन्मठेप, तसेच १५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मृत महिलेच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, उपनिरीक्षक विद्याधर निचित, पोलीस शिपाई रोहिदास खाडे यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.
