पुणे : जमिनींची अचूक आणि कमी वेळात मोजणी करण्यासाठी एक हजार जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) घेण्याबाबत भूमी अभिलेख विभागाकडून निविदा मागविल्या होत्या. मात्र, या निविदांचे दर जास्त आल्याने सर्व निविदा फेटाळून नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रोव्हरद्वारे जमीन मोजणीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.कोणत्याही जमिनीची तासाभरात मोजणी करण्यासाठी राज्य शासनाने एक हजार रोव्हर यंत्रे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्याकरिता ८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ७७ स्थानके (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स) उभारली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक स्थानकांवर एक यंत्र उभारण्यात येणार असून भूमी अभिलेख विभागाने मे महिन्यात ७७ स्थानकांसाठी निविदा मागविल्या. त्यानुसार विभागाकडे ८८ निविदा प्राप्त झाल्या. मात्र, सर्व निविदा चढ्या दराने आल्याने प्राप्त निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘रोव्हर यंत्रे खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदांबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. सर्व निविदा वाढीव दराने आल्याचे सांगताच महसूल मंत्र्यांनी नव्याने निविदा काढण्याची सूचना करून मंजुरीही दिली. त्यानुसार ७७ स्थानकांवरील रोव्हर यंत्रे खरेदीसाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहे. या प्रक्रियेला काहीसा विलंब लागण्याची शक्यता असली, तरी पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडली जाईल.’

हेही वाचा : श्रीनगरमधील त्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

रोव्हर यंत्रच का?

सध्या भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात येत आहे. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जात आहे. या प्रक्रियेला तीन ते चार तासांचा कालावधी लागतो आहे. जीपीएस रीडींग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. रोव्हर मशीन उपग्रहाच्या आधारे प्राप्त तरंगलहरीद्वारे (सिग्नल) अचूक ठिकाण दर्शवते. संबंधित ठिकाणचे अक्षांश-रेखांशवरून ऑटोकॅड सारख्या संगणकप्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर अवघ्या तासाभरात दहा एकर जमिनीची अचूक आणि सूलभ मोजणी करता येणार आहे, असेही रायते यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One thousand land measuring machines new tender process pune print news tmb 01
First published on: 05-10-2022 at 16:59 IST