पाऊस नसल्याने उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरातही एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला असून याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी होणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर होईल, असे सांगण्यात आले.
पाणीकपातीचा निर्णय घेण्यापूर्वी आयुक्त जाधव यांनी पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील पाणीसाठय़ाचा आढावा घेतला. सध्या पवना धरणात १७ टक्के पाण्याचा साठा असून येत्या २१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरातील ७० टक्के भागात दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. एक वेळ पाणीपुरवठा करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी मंगळवारी आयुक्तांनी गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. पाण्याची स्थिती त्यांना बैठकीत देण्यात येणार असून बुधवारपासून एक वेळ पाणीपुरवठय़ाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे, असे शहर अभियंता महावीर कांबळे यांनी सांगितले.