लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काही भागांत एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कोंडी कमी होण्यासाठी टप्पा क्रमांक एक ते चारमधील कंपन्यांमधील कामकाज सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत १५ मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक समस्या कमी होण्यास काही प्रमाणात मदत झाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूककोंडीबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. चाकण येथील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचना, उपाययोजनांची अंमलबजावणी झाली आहे का, शासनाकडून कोणती कार्यवाही, उपाययोजना केल्या जात आहेत, अशी विचारणा केली.

उद्योगमंत्री सामंत यांनी लेखी उत्तर दिले आहे. ‘पिंपरी-चिंचवड पोलिसांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. चाकण टप्पा क्रमांक तीनमधील रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक तेथे सिमेंट काँक्रीट पाइप टाकण्यात आले आहेत. टप्पा क्रमांक एक ते चारमधील कंपन्यांमधील कामकाज सुरू होण्याच्या व संपण्याच्या वेळेत १५ मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. टप्पा क्रमांक तीनमधील विद्युत वितरण कंपनीच्या उच्चदाब वाहिनीखाली साहित्य, माल घेऊन आलेल्या अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी महापारेषणकडे अभिप्राय मागविण्यात आला आहे.

कंपन्यांच्या भूखंडामधून वाहून येणारे पावसाचे पाणी रस्त्यावर न येण्यासाठी ते पाणी गटारात सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत. एमआयडीसीच्या हद्दीतील पावसाळे नाले गाळमुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल. कंपन्यांच्या बस त्यांच्याच भूखंडामध्ये उभ्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एमआयडीसीच्या क्षेत्राच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यात येत असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असल्याचे सामंत यांनी सांगितले.

एकेरी वाहतुकीमुळे काही प्रमाणात कोंडी कमी झाली आहे. परंतु, पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे येथील उद्योगांचा श्वास कोंडला आहे. यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल यांनी केली.