पुणे : ऑनलाइन गेमच्या नादात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३६ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका व्यावसायिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तरुण वाघोली भागातील एका सोसायटीत राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठविली.
ऑनलाइन गेम खेळल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगून त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला ऑनलाइन गेम खेळण्यास प्रवृत्त केले. गेल्या आठ महिन्यात तरुणाने ऑनलाइन गेमच्या नादात ३६ लाख ७४ हजार रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.
ऑनलाइन गेमच्या नादात अनेक तरुणांनी पैसे गमावले आहेत. ऑनलाइन गेमच्या आहारी शाळकरी मुले गेल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी शिरूरमधील एका शाळकरी मुलाची ऑनलाइन गेमच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली होती. ऑनलाइन गेमचे आमिष दाखविणाऱ्या जाहिराती, तसेच लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची सहा लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण हडपसर भागात राहायला आहे. तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता.
ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. चोरट्यांनी सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने एका काम करण्यास दिले. चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यात परताव्यापोटी काही रक्कम जमा केली. परताव्यापोटी रक्कम मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. तरुणाला चोरट्यांनी जाळ्यात ओढले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.
