पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची मौखिक परीक्षा ऑनलाइन आणि किंवा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षा पद्धतीबाबतचा निर्णय संबंधित मार्गदर्शकांवर आणि संशोधन केंद्र प्रमुखांवर सोपवण्यात आला असून मार्गदर्शकांना दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

हेही वाचा <<< मराठा आरक्षणाबाबतच्या सुनावण्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच; राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय

विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मौखिक परीक्षा गेली दोन वर्षे ऑनलाइन घेतल्या जात होत्या. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या परीक्षा पुन्हा प्रत्यक्ष पद्धतीने घेतल्या जाऊ लागल्या. पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मौखिक परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्याची विनंती केली. त्यानुसार विद्यापीठाने दोन्ही पर्याय खुले असल्याचे स्पष्ट करून परीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन याचा निर्णय मार्गदर्शकांवर सोपवला. जर मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुख ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम असतील तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून तोंडी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे विद्यापीठाने नमूद केले.

हेही वाचा <<< जुन्नर, आंबेगावनंतर आता शिरूर तालुक्यातही बिबट्याचा वाढता वावर; उसाच्या क्षेत्रात वास्तव्य, हल्ल्याच्या घटनांत वाढ

परीक्षा ऑफलाइन घ्यावी की ऑनलाइन या बाबत संशोधन केंद्र प्रमुख आणि मार्गदर्शक यांच्यात एकमत न झाल्यास संबंधित निर्णय त्या त्या विभागाचे अधिष्ठाता घेतील. परीक्षेबाबत एकमताने झालेला निर्णय विद्यार्थ्यांना मान्य करावा लागेल. मार्गदर्शक अथवा संशोधनप्रमुख सांगतील त्याच पद्धतीने परीक्षा देणे बंधनकारक असेल. करोनाच्या काळात पीएच.डी.च्या तोंडी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडल्या होत्या. त्यामुळे हा पर्याय उत्तम असल्यानेच दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.