पुणे: देशात सध्या एक हजार लोकसंख्येमागे रुग्णालयांतील खाटांचे प्रमाण केवळ १.३ आहे. हे प्रमाण सरासरी ३ असणे आवश्यक आहे. यामुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी २४ लाख खाटांची आवश्यकता आहे. याचबरोबर हजार लोकसंख्येमागे डॉक्टरांचे प्रमाण ०.९ असून, त्यातून देशभरातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र समोर आले आहे.

देशातील आरोग्यव्यवस्थेचे हे चित्र केवळ सरकारी रुग्णालयांतील नसून त्यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. नाइट फ्रँक आणि अमेरिकेतील बेर्काडिया यांनी सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार, देशाची १.४२ अब्ज लोकसंख्या लक्षात घेता अजून २ अब्ज चौरस फुटांच्या आरोग्य सुविधांचा तुटवडा आहे. त्यामुळे आगामी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभाराव्या लागतील. सर्वसाधारणपणे एक हजार लोकसंख्येमागे रुग्णालयांतील खाटांचे प्रमाण ३ असणे आवश्यक आहे. भारतात हे प्रमाण केवळ १.३ आहे. त्यामुळे एक हजार लोकसंख्येमागे १.७ खाटांची तूट भरण्यासाठी आणखी २४ लाख खाटांची आरोग्य सुविधा निर्माण करावी लागेल.

हेही वाचा… आयटी शहरांमध्ये घरे दिवसेंदिवस महागडी! जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती…

भारतात सरकारी आणि खासगी आरोग्य सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. यामुळे खासगी आरोग्य सुविधांचा विस्तार अतिशय वेगाने होताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार, रुग्णालयांसह वैद्यकीय पायाभूत सुविधा क्षेत्रात ५८२ गुंतवणूक संधी असून, त्यांचे एकत्रित मूल्य ३२ अब्ज डॉलर आहे. देशातील आरोग्य सुविधा बाजारपेठांतील तब्बल ८० टक्के हिस्सा रुग्णालयांचा आहे. सध्या देशात एकूण ७० हजार रुग्णालये असून, त्यातील ६३ टक्के खासगी आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जगभरातील आरोग्य व्यवस्थेचे चित्र

देशहजार जणांमागे खाटाहजार जणांमागे डॉक्टर
अमेरिका२.९२.६
ब्रिटन२.५५.८
चीन४.३
जपान१३२.५
भारत१.३०.९